रत्नागिरीत 516 गावांचे होणार ड्रोन सर्वेक्षण

गावठाणांच्या सीमा निश्‍चितीसाठी पथदर्शी प्रकल्प
भूमी अभिलेख विभागाची शासनाकडे मागणी
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील 516 गावांचे भूमी अभिलेख विभागामार्फत स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन कॅमेर्‍याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी मंडणगड तालुक्यात पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे. ग्रामीण भागातील गावठाणांच्या सीमा निश्‍चित करून गावातील नदी, ओढे, नाल्यांच्या सीमा तसेच रस्त्यांच्या जागा निश्‍चित करण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक तालुक्यातील गावे निश्‍चित केली आहेत; मात्र मंडणगड, दापोली तालुक्यात सर्वांत जास्त गावे आहेत. शासनाकडून ड्रोन कॅमेरा मागितला असून भूमी अभिलेख विभाग आता तारखांच्या प्रतीक्षेत आहे.
महाराष्ट्रातील सर्व गावांच्या गावठाणाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दहा गावांची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 516 गावांचा समावेश असून त्याचे ड्रोन कॅमेर्‍याद्वारे सर्वेक्षण होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने त्यावर काम केले असून जिल्ह्यातील या गावांची निवड केली आहे. समुद्रसपाटीपासून गावाची उंची व ठिकाण तसेच अन्य अनुषंगिक मुद्द्यांच्या आधारे तपासणी झाल्यानंतर ड्रोन कॅमेरा सर्वेक्षणासाठी गावांची निवड केली आहे.
चौकट..
गावागावातील वाद कमी होण्यास मदत
ड्रोन सर्वेक्षणाच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय कामाचे नियोजन आहे. निवड केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन ही माहिती दिली जाणार आहे. गावात दवंडीद्वारे ड्रोन सर्वेक्षणासंदर्भात माहिती देऊन प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. गावातील नद्या, ओढे, नाले, रस्त्याचे चित्रीकरण व सर्वेक्षण करून मोजणी केली जाणार आहे. नद्यानाल्यांची, रस्त्याची जागा ठरवून दिली जाणार आहे. यामुळे गावातील वाद कमी होणार आहेत.

Exit mobile version