2 डिसेंबर पासून होणार सुरुवात, 336 गावातील गावठाण हद्द निश्चित होणार
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील सर्व गावातील गावठाण क्षेत्र यांच्यामधील घरे, रस्ते, नाले यांच्या सीमा निश्चित करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाकडून तालुक्यातील सर्व 336 गावांचे ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. 2 डिसेंबर पासून या प्रकल्पाची सुरुवात होणार असून ड्रोन सर्वेक्षणानंतर घरमालकांना आपल्या मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. शासनाची यंत्रणा यानिमित्ताने अद्यावत होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारचा ग्रामविकास विभाग, महसूल आणि भूमिअभिलेख विभाग यांच्या माध्यमातून हे ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. कर्जत तालुक्यात आतापर्यंत केवळ सात गावातील, शहरातील मिळकती यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार आहेत. त्यात कर्जत शहर, गुंडगे, नेरळ, कळंबभिसेगाव आणि माथेरान या सात गावांचा समावेश आहेत. मात्र तालुक्यातील अन्य महसुली गावांचे गावठाणांमधील मिळकती यांचे सर्वेक्षण आजपर्यंत झाले नाही. तालुक्यातील 336 गावांमधील गावठाण मिळकत यांचे सर्वेक्षण करणे मनुष्यबळ लावून करणे सोपे नाही, म्हणून राज्य सरकार कडून सर्व्हे ऑफ इंडिया कडून ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रकल्प कर्जत तालुक्यात राबविला जाणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामविकास विभाग, महसूल व वन विभाग आणि भूमी अभिलेख यांच्या माध्यमातून हे ड्रोन सर्वेक्षण गावठाण क्षेत्र निश्चित करण्यासाठी कर्जत तालुक्यात केले जाणार आहे. ड्रोनने एकदा आकाशात झेप घेतली की एकावेळी पाच गावांचे सर्वेक्षण करण्याची किमया हा ड्रोन करु शकतो. ड्रोन सर्वेक्षणाची सुरुवात कर्जत तालुक्यात 2 डिसेंबर पासून होत असून शिरसे ग्रामपंचायत मधील तमनाथ गावात या कार्यक्रमानंतर ड्रोन आकाशात झेपावेल.
जीआयएस प्रणालीवर आधारित गावठाण निश्चित होणार असल्याने शासनाकडून नोंदवही अद्ययावत होणार असताना संगणकीय प्रणालीवर भविष्यात नकाशे निश्चित करण्यासाठी ड्रोन ने केले जाणारे गावठाण सर्वेक्षण फायद्याचे ठरू शकते अशी माहिती कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि भूमी अभिलेखचे उपअधीक्षक इंद्रसेन लांडे यांनी दिली आहे.या कमी ग्रामसेवक,तलाठी,मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी,नायब तहसीलदार,गटविकास अधिकारी तहसीलदार यांच्यासह भूमिअभिलेख चे सर्व्हेअर देखील ड्रोन सर्वेक्षणात सहभागी असणार आहेत.