| मुंबई | प्रतिनिधी |
चरस आणि शस्त्रासह एका सराईत आरोपीला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. आरोपीविरोधात यापूर्वीही अंमलीपदार्थ विक्रीचे दोन व सेवनाबद्दल एक गुन्हा दाखल आहे. मुंबईत अंमलीपदार्थ विक्रेत्याविरोधात विशेष मोहिम राबवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक उपायुक्त (परिमंडळ-10) सचिन गुंजाळ यांनी अंमलीपदार्थ सेवन व विक्रीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी गुन्हयाच्या वेळा, ठिकाणे, अभिलेखावरील आरोपी तपासणी करण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना केल्या होत्या. त्या माहितीच्या आधारे पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शोभराज सरक व त्यांच्या पथकाने पवई परिसरात विशेष मोहिम राबवली. त्यावेळी पवई येथील विहार सरोवराजवळील चांदशहावली दर्गा कंपाउंडच्या बाजुला मोटरगाडी उभी असल्याचे दिसून आले. तपासणी केली असता त्या मोटरगाडीमध्ये मोहम्मद सादिक हनिफ सय्यद (46) ही व्यक्ती सापडली. तो अंमलीपदार्थांचा सराईत विक्रेता आहे. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. मोटरगाडीची तपासणी केली असता सहा किलो 32 ग्रॅम संशयीत पदार्थ सापडला. त्याची तपासणी केली असता ते चरस असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यांत एकूण 13 किलो 217 ग्रॅम चरस (किंमत तीन कोटी 30 लाख 42 हजार 500 रुपये) एक गावठी कट्टा (किंमत10 हजार रुपये), मोटरगाडी (किंमत चार लाख रुपये) व साडे तीन हजार रोख रक्कम असा एकूण तीन कोटी 34 लाख 55 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अंमलीपदार्थांचा सराईत विक्रेता असून यापूर्वीही त्याच्याविरोधात अंमलीपदार्थ विक्रीचे दोन व अंमली पदार्थ सेवनाचा एक गुन्हा दाखल आहे. आरोपीने अंमली पदार्थ कोठून आणले याबाबत पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.