| महाड | वार्ताहर |
महाड औद्योगिक वसाहतीत अंमली पदार्थ बनवणाऱ्या एका कारखान्यावर मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.23) रात्री महाड एमआयडीसी पोलीस, रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी संयुक्तपणे केली आहे. कारवाई दरम्यान 88 कोटी 92 लाख रुपये इतक्या प्रचंड किंमतीचा ‘किटामाइन’ हा प्रतिबंधित अंमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाड एमआयडीसीतील प्लॉट नंबर.E.26/3 या प्लॉटमध्ये ‘रोहन केमिकल कंपनी’ कार्यरत असून, कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून 34 किलो ‘किटामाईन ‘ पावडर आणि 13 किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला.
या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादना ऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा संशय असून, याप्रकरणी मच्छिंद्र भोसले रा. जिते ता. महाड, सुशांत पाटील रा. मोहप्रे ता. महाड, शुभम सुतार जिल्हा कोल्हापूर व रोहन गवस रा. मुंबई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबाबत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी कारवाई पथकाचे अभिनंदन केले आहे.
याबाबत इकबाल चांद का शेख (35) यांनी महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव पुष्कराज सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे अमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात तसेच, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले आहे. तरी महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये अशाच प्रकारे रात्रीच्या सुमारास बेकायदेशीररित्या अमली पदार्थ बनवण्याचा धंदा चालत असल्याचे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यातील कर्मचाऱ्यांकडून चर्चिले जात आहे.





