| मुंबई | प्रतिनिधी |
सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन दिवस केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत 6 कोटी 41 लाख रुपयांचे अमली पदार्थ व सोने जप्त केले. 3 ऑगस्ट व 4 ऑगस्ट रोजी केलेल्या दोन कारवायांमध्ये दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. याप्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे.
सीमाशुल्क विभागाने 3 ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत मेणात लपवून सोन्याच्या तस्करीत मदत करणाऱ्या विमानतळावरील कर्मचाऱ्याला अडवले. एका प्रवाशाने या कर्मचाऱ्याला मेणाचे तुकडे विमानतळाबाहेर नेण्यासाठी दिले होते. तपासणी त्या मेणामध्ये 1510 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड सापडली. त्याची किंमत 1 कोटी 39 लाख रुपये आहे. सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याला अटक केली. आरोपीविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत लपवून ठेवलेला सुमारे 5027 ग्रॅम वजनाचा हिरव्या रंगाचा संशयीत पदार्थ सापडला. तपासणीत तो हायड्रोपोनिक गांजाचा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडील बॅगेमध्ये प्लास्टिक पिशवीत लपवून गांजाची तस्करी करण्यात येत होती. त्या आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 5 कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रकरणांमागे आंतरराष्ट्रीय तस्कराच्या टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपास करीत आहे.







