2.5 लाखांचे हेरॉईन जप्त
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात वाढत्या नशेच्या बाजारावर पोलिसांनी जोरदार कारवाई करत जासई येथे छापा टाकून तब्बल 2.5 लाखांचे हेरॉईन जप्त केले. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून, नशेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईमुळे गंभीर सामाजिक संकट उभे राहिल्याचे चित्र समोर आले आहे.
उरण तालुक्यात चरस, गांजा व इतर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, अनेक ठिकाणी खुलेआम नशेचा बाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. या अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचा फटका सर्वाधिक शाळा व महाविद्यालयातील तरुणांना बसत असून, तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नशेच्या आहारी गेलेले अनेक जण पुढे गुन्हेगारीकडे वळत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर उरण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान शुक्रवारी दुपारी जासई येथील पार्किंग परिसरात छापा टाकून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणासह त्याचे सेवन करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईत 2 लाख 52 हजार 800 रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, जासई येथील शीतल परिवहन पार्किंगच्या मागे जांभळाच्या झाडाखाली काही तरुण संशयास्पदरीत्या अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 10 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 2 वाजता छापा टाकण्यात आला. यावेळी रवींद्र कल्याण शेट्टी (27), गणेश दत्तू भिडे (25) व गणेश विनय पाटील (19) हे तिघेही अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आले.
झडतीदरम्यान गणेश पाटील याच्याकडे 6.32 ग्रॅम वजनाच्या हेरॉईनच्या 85 पुड्या सापडल्या. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 2,52,800 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांनी दिली. दरम्यान, उरणमध्ये मोठ्या प्रमाणात नशेच्या पदार्थांची विक्री सुरू असल्याने अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक संस्था व संघटनांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.







