। अलिबाग | प्रतिनिधी ।
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी अलिबाग समुद्रकिनारी धिंगाणा घातला. दारूच्या नशेत हा प्रकार घडला. पर्यटकांना ताब्यात घेऊन त्यांना अलिबाग मधील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ही घटना रविवारी (दि.27) सायंकाळी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील हे चौघेजण पर्यटक आहेत. शनिवार व रविवार सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी हे पर्यटक अलिबागला आले होते. दुपारनंतर अलिबाग समुद्रकिनारी दारूच्या नशेत असताना त्यांनी धिंगाणा घातला. समुद्रकिनारी फिरण्यास आलेल्या अन्य पर्यटकांना त्यांचा प्रचंड त्रास होऊ लागला. ही बाब अलिबाग पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या पर्यटकांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तरी देखील ते पर्यटक कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर त्यांना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात सायंकाळी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.






