| मुंबई | प्रतिनिधी |
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शनिवार (दि. 25) रोजी महाराष्ट्रात ड्राय डे पाळण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दारूची दुकाने, बार, पब तसेच मद्यविक्रीचा परवाना असलेली आस्थापने दिवसभर बंद राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांनुसार धार्मिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा निर्णय दरवर्षीप्रमाणे यंदाही लागू करण्यात आला आहे.
आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दरवर्षी मद्यविक्रीवर बंदी घालण्यात येते. त्यानुसार यंदाही मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व जिल्ह्यांत ड्राय डे लागू राहणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क नियमांनुसार संबंधित अधिसूचना जारी करण्यात येणार असून, या दिवशी मद्याची दुकाने, बार, पब तसेच परवानाधारक किरकोळ विक्री केंद्रांवर मद्याची विक्री आणि सेवा करण्यास मनाई असेल. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही नियोजन करताना या निर्बंधांची माहिती ठेवून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या राज्यात ड्राय डे
