अब्बासअली हुसेन पिरभोय यांचा पुढाकार
। माथेरान । वार्ताहर ।
अब्बासअली हुसेन पिरभोय यांनी आपल्या वडिलोपार्जित दातृत्वाच्या सवयीमुळे निराधार लोकांना उदरनिर्वाहसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. हा कार्यक्रम दि.27 मार्च रोजी हॉटेलच्या प्रांगणात पार पडला.
यामध्ये विधवा महिलांना तांदूळ, खाद्यतेल पाकीट, पोहे, डाळ, गव्हाचे पीठ व इतर सामानाचे वाटप केले. पुढील दोन महिन्यांसाठी सुध्दा अशाचप्रकारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याचे अब्बासअली हुसेन पिरभोय यांनी सांगितले. माथेरानमधील हॉटेल धारकांमध्ये अब्बासअली हुसेन पिरभोय हे एकमेव मालक आहेत की ज्यांनी निस्वार्थीपणे गोरगरिबांना, गराजवंतांना, निराधार विधवा महिलांना, कष्टकरी हातगाडी चालकांनामोफत भोजनाची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनासुध्दा दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. अनेक विद्यार्थ्यांना परिस्थितीअभावी महाविद्यालयात शिक्षण घेता येत नाही. अशा ठराविक विद्यार्थ्यांसाठी एक पाऊल पुढे टाकल्यास गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळू शकतो. याकामी अब्बासअली हुसेन पिरभोय हे पुढाकार घेणार आहेत. यासाठी त्यांना हॉटेलचे मॅनेजर मेहबूबभाई तसेच हॉटेलमधील अन्य कामगार वर्ग सहकार्य करीत असतात. अब्बासअली यांच्या या निःस्वार्थी सेवेबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.