। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
सध्या महागाईने कहर केला असून घर खर्चाचे नियोजन करताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्वयंपाकाचा गॅस महागल्याने अनेक महिलांचा कल सध्या चुलीकडे वळला आहे. त्यामुळे चुलीसाठी लागणार्या सरपणाची ग्रामीण भागात मागणीही वाढली आहे. त्यामुळे या गृहिणींना सरपण पुरवण्यासाठी लाकडाची मोळी विकणार्या आदिवासी महिला दिसत असून हेच त्यांच्या रोजगाराचे साधन बनले आहे.
काही वेळा हाताला काम मिळत नसल्यामुळे जंगलाचा राजा त्यांच्या मदतीला धावून येत आहे. त्यामुळे जंगलात असलेली लाकडे हेच त्यांचे उपजिवीकेचे साधन निर्माण झाले आहे. महागाईमुळे गॅस परवडत नसल्याने स्वयंपाक करण्यासाठी सुक्या लाकडांचा वापर करीत आसल्याने, आदिवासी समाजाला रोजगार उपलब्ध झाला आहे. चुलीवर शिजवलेल्या जेवणाची लज्जत औरच असते. शिवाय घरचे बजेट जुळवण्यासाठी या परिसरात अनेक घरांमध्ये चुलींवर स्वयंपाक होताना दिसत आहे. या सुकलेल्या लाकडांची मोळी 150 ते 200 रूपयांपर्यंत विकत असून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. लाकडे विकून आदिवासी महिलांना 8 महिने रोजगार मिळत असून महागाईने त्रस्त झालेल्या गृहिणींना देखील दिलासा मिळत आहे.