अमेरिकाविरोधात अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टी20 विश्वचषकात आज टीम इंडिया यजमान अमेरिकासोबत भिडणार आहे. आजचा सामना जिंकून सुपर 8 मधील स्थान निश्चित करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. अमेरिकासाठीही हा सामना महत्वाचा आहे, त्यांचेही चार गुण आहेत. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर स्थानिक वेळेनुसार, सकाळी दहा वाजता सामना सुरु होईल. मागील दोन्ही सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघात आज बदलाची शक्यता आहे. अमेरिकाविरोधात भारतीय संघात दोन बदल होऊ शकतात. फॉर्मात नसलेला शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. दोन्ही सामन्यात दुबे आणि जडेजा यांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
पाकिस्तानविरोधात झालेल्या सामन्यात शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा सपशेल अयपशी ठरले. दुबे याला सात चेंडूत फक्त सात धावाच करता आल्या. तर रवींद्र जडेजाला खातेही उघडता आले नाही. जडेजा गोलंदाजीतही फ्लॉप ठरला. त्याशिवाय फिल्डिंग करताना दुबेने झेल सोडला होता. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. शिवम दुबे याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर रवींद्र जडेजाच्या जागी कुलदीप यादव याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. दोन्ही खेळाडू भन्नाट फॉर्मात आहेत. सुपर 8 मधील सामन्याआधी भारतीय संघ मोठे प्रयोग करण्याची शक्यता आहे.
आयर्लंड आणि पाकिस्तानविरोधात रनमशीन विराट कोहलीला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. सलामीला उतरणाऱ्या विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची सलामी अद्याप हवी तशी झाली नाही. तरीही आजच्या सामन्यात विराट कोहलीलाच स्थान मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहलीकडे दांडगा अनुभव आहे, त्याचा फायदा भारतीय संघाला होईल. त्यामुळे यशस्वी जायस्वाल याला अजूनही वाटच पाहावी लागणार आहे. फ्लॉप ठरणाऱ्या शिवम दुबे याच्या जागी यशस्वी जायस्वाल याला संघात स्थान दिले जाऊ शकते. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरु शकतो. आशा स्थितीमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल सलामीची जबाबदारी पार पाडू शकतात.
अमेरिकाविरोधात भारताची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.







