। अलिबाग । प्रतिनिधी ।
शनिवार व रविवार तसेच सोमवार अशी सलग तीन दिवस सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक रायगडात दाखल झालेले आहेत. यामुळे सर्वच किनार्यांवर पर्यटकांची भरती आल्याचा भास निर्माण झाला आहे. यामुळे छोट्या, मोठ्या व्यावसायिकांनीही दिलासा मिळाला आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होताना दिसत आहे.
शनिवारी सकाळपासून पर्यटक अलिबागसह नागाव, वरसोली समुद्रकिनारी फिरण्यास आले आहेत. उन्हाचा तडाखा बसत असल्याने समुद्रात पोहण्याचा आनंद लुटण्यावर पर्यटकांनी भर दिला आहे. त्यामुळे समुद्रकिनारे फुल्ल झाल्याचे दिसून येत आहेत. शाळांना सुट्टी पडली आहे. त्यात शनिवार, रविवारला जोडून आलेली महाराष्ट्र दिनाची सुट्टी यामुळे विकेन्ड साजरा करण्यासाठी काही पर्यटक सरकारी वाहनाने तर काही खासगी वाहनाने तर काही सागरी मार्गे प्रवासी बोटीने अलिबागमध्ये दाखल झालेले आहेत.
अलिबागसह नागाव, आक्षी, वरसोली, किहीम, मांडवा, आवास, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिघी अशा अनेक समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी होऊ लागली. अनेक जण समुद्राच्या लाटांच्या सानिध्यात राहून पर्यटनाचा आनंद लुटत होते. काही जण कुटूंबियांसमवेत, तर काहीजण मित्र मंडळींसमवेत समुद्रकिनारी मौजमजा करीत होते. काहींनी घोडागाडी, एटीव्ही बाईक्सवर स्वार होऊन समुद्रकिनार्यांचा आनंद लुटला. काहींनी सागरी क्रीडांचा आनंद घेत सुट्टी उत्साहात घालविण्याचा प्रयत्न केला. किनार्यांवर पर्यटकांची गर्दी वाढल्याने किनारे पर्यटकांनी फुलून गेले. समुद्रकिनारी असलेलल्या स्टॉलमधून वडापाव, भजी, पॅटीस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य पदार्थांवर पर्यटकांनी ताव मारला. यातून स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. तीन दिवस सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनारी पोलीस, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
म्हावर्याला पसंती
सलग तीन दिवस सुट्टी असल्याने अलिबागसह जिल्हयातील अनेक हॉटेल, कॉटेजेस पर्यटकांनी फुल्ल झाले. रायगड जिल्हयात फिरण्यास आल्यावर सागरी मासळी खाण्यावर पर्यटकांनी अधिक भर दिला. त्यात पापलेट, सुरमई बांगडा, मांदेली अशा अनेक सागरी मासळीचा आनंद खवय्यांनी वेगवेगळ्या हॉटेल, कॉटेजमधून घेतला.
रणगाडा ठरतोय आकर्षण
1971 च्या लढ्यात पाकिस्तानला नामोहरम करणारा विजयचे प्रतीक असणार्या टी 55 रणगाडा अलिबाग समुद्रकिनारी उभा करण्यात आला आहे. हा रणगाडा गेल्या तीन वर्षापासून समुद्रकिनारी मोठया दिमाखात उभा आहे. समुद्रकिनारी फिरण्यास येणार्या पर्यटकांसाठी तो आकर्षण ठरत आहे. या रणगाड्यासमवेत फोटो काढण्याला अधिक पसंती पर्यटक देत आहेत.
धकाधकीच्या जीवनात पर्यटनही एक पर्वणी ठरू लागली आहे. अलिबाग व अन्य समुद्रकिनारी चांगल्या सुविधा असल्याने आम्ही याठिकाणी सुट्टीच्या दिवशी येतो. समुद्र किनार्याच्या सानिध्यात आनंद साजरा केल्याने वेगळाच उत्साह निर्माण होतो.
प्रवीण गायकवाड, पर्यटक