वृक्षतोडीमुळे सुगरणीचा खोपा टांगणीला

घरटे विणण्यास पक्ष्यांना अडचण
उरण । वार्ताहर ।
सुगरण पक्ष्याएवढे घरटे बनविण्याचे तंत्रज्ञान अन्य कोणत्याही पक्ष्यात दिसून येत नाही. मात्र बदलत्या युगामध्ये तसेच सिमेंटच्या जंगलामध्ये वृक्षसंपदा नष्ट होत असल्यामुळे सुगरण पक्ष्यांचा खोपा टांगणीला लागला आहे. जागाच शिल्लक नसल्याने घरटे कुठे बांधायचे, हा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे. सुगरण पक्षी जन्माला येणार्‍या पिलासाठी विणीचा हंगाम सुरू झाल्यावर घरटे विणण्यास सुरूवात करते. कारण तो तिचा प्रजनन काळ असतो. विणीच्या हंगामात घरटे विणण्याचे काम दरवर्षी पूर्ण होते. झाडावर उलट्या स्थितीत बकपात्राच्या आकाराचा खोपा बनविणारा सुगरण पक्षीच सुगरण मानली जाते. बारीक गवताच्या साहाय्याने खोपा बनविला जातो. यामध्ये पावसाचा, उन्हाचा शिरकाव होत नाही.
20-30 पक्ष्यांचा समावेश असलेले हे थवे काटेरी बाभळीच्या किंवा नारळाच्या फांद्यांवर खोपा विणलेला पाहावयास मिळतो. झाडावरील पाने अथवा गवत चोचीने सोळून एक अथवा दोन मजल्यांचा आकर्षक, सुंदर खोपा तयार करीत असल्यामुळे या घरट्याकडे पाहताच आरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, पिलासाठी जीव तीन झाडाला टांगला या काव्यपंक्तीची लागलीच आठवण होते. पूर्वी रस्तोरस्ती उंच झाडांवर मोठ्या प्रमाणात सुगरणीची घरटी पहावयास मिळत होती. रस्तोरस्ती दृष्टीत पडणार्‍या या सुगरणीच्या आकर्षक घरट्यांकडे वाटसरूंचे हमखास लक्ष वेधले जायचे.

घरट्यांचे प्रमाण होताहे दुर्मिळ
आजही सुगरणीची घरटी पाहण्यास मिळत आहेत. मात्र या घरट्यांचे प्रमाण दुर्मीळ होत चालले आहे. तसेच जंगलात वणवे लावण्याचे अथवा लगण्याच्या प्रमाणातही नजीकच्या काळात वाढ झाली असल्याने सुगरण पक्ष्यांची घरटी जळून खाक होत आहेत.

Exit mobile version