| श्रीवर्धन | वार्ताहर |
तालुक्यात आठ जून रोजी पाऊस पडायला सुरुवात झाली होती. परंतु दोन दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा दडी मारली होती. शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती आपल्या शेतामध्ये भात पेरणी केलेली होती. पहिला पाऊस पडल्यानंतर भाताचा रुजवा चांगल्या प्रमाणात झाला होता. नंतर पाऊस गायब झाल्यामुळे भात रोपे करपून जातात की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यानंतर पावसाने दमदार सुरुवात केली व भात रोपे देखील लावणी योग्य झाली. परंतु मागील चार दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. दिवसातून एखाद छोटीशी पावसाची सर कोसळते.
त्यामुळे भात लावणीची कामे खोळंबल्याचे पाहायला मिळत आहे. कारण शेतामध्ये भरपूर पाणी व चिखल असल्याशिवाय भात लावणी करता येत नाही. समुद्र खवळलेला असला तरीही नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर कमी असल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शुक्रवार 5 जून रोजी अमावस्या आहे. याच दिवशी पुनर्वसू नक्षत्र निघत असून या नक्षत्राचे वाहन हत्ती हे आहे. त्यामुळे अमावस्येपासून तरी पाऊस चांगल्या प्रमाणात लागेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने उष्म्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.