पोश्री नदीवरील बोरगाव पूल आठ वर्षांपासून अपूर्ण
। नेरळ । वार्ताहर ।
विकसनशील तालुक्याचा बोलबाला असला तरी कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील पोश्री नदीवर पुल नसल्याने ग्रामस्थांना शेतीसाठी अक्षरशः रोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नदीच्या दुसर्या काठाकडे शेती क्षेत्र असल्याने जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ कामासाठी जातात. त्यामुळे या स्थितीकडे दुर्लक्ष करणार्या प्रशासकीय अधिकार्यांची संवेदना केव्हा जागृत होईल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जवळपास 8 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. बांधकाम खात्याने दिलेल्या निधीमधून पुलाचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक होते, मात्र ठेकेदाराने पुलाचे काम अपूर्ण केल्याने कामासाठी केलेला खर्च पाण्यात गेला. पुलाचे दोन्ही भाग जोडले गेले नसल्याने त्या दुसर्या बाजूला जाण्यासाठी शिडीचा वापर करावा लागत आहे.
बोरगावकडून पेंढरीकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूने पोश्री नदी वाहते. या नदीच्या पलीकडे गुडवण भागात बोरगाव, भवानीपाडा, उंबरखांड येथील स्थानिक नागरिकांच्या जमिनी आहेत. त्या शेतकर्यांना पावसाळ्यात भाताची शेती करण्यासाठी जावे लागते. पोश्री नदीवर शासनाने लाखो रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला परवानगी देत पुलाचे काम मंजूर केले. त्या पुलाचे काम कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदार नेमून सुरु करण्यात आले. पूल उभारण्यासाठी नदीमध्ये तीन पिलर उभे करण्यात आले असून त्यावर स्लॅब टाकून पूल तयार झाला. पण त्या पुलावरून आजूबाबाजुच्या भागात जाण्यासाठी जोडरस्ता तसेच मातीचा भराव टाकून रस्ता तयार करून देणे आवश्यक होते. मात्र तसे न केल्याने शेतकर्यांना शिडिचा आधार घ्यावा लागत आहे.
गेल्या आठ वर्षांपासून बोरगाव पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरतील गावातील शेतकर्यांना शेतीच्या कामांसाठी धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून पूल पूर्ण करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या मार्गावरुन प्रवास करताना जीवितहानी होण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे.
राकेश खडेकर, शेतकरी, बोरगाव-भवानीपाडा