भरपावसात विद्यार्थ्यांची पायपीट

कर्जत आगाराने लक्ष घालण्याची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील कळंब परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वेळेवर एसटी गाड्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पैसे मोजून खासगी वाहनातून किंवा रस्त्याच्या बाजूने चालत जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची पायपीट दूर करण्यासाठी कर्जत राज्य परिवहन आगाराने एसटी गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे.

कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील बोरगाव गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जाण्यासाठी एसटी बस सुविधा नसल्याने पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. लवकरात लवकर एसटी बस सेवा सुरु करावी, अशी विद्यार्थी मागणी करत आहेत.

अन्न, वस्त्र, निवारासोबतच शिक्षण व आरोग्य यादेखील माणसाच्या मूलभूत गरजा बनल्या आहेत. मात्र, हेच शिक्षण घेण्यासाठी बोरगाव गावातील विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो. गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर कळंब, नेरळ आणि कर्जत या ठिकाणी जावे लागते. दररोज सुमारे 40 विद्यार्थी शिक्षणासाठी गावाबाहेर जात असतात. खासगी वाहनाने प्रवास करणे खिशाला परडवत नसल्याने हे विद्यार्थी पाच किलोमीटरचा पायी प्रवास करत कळंबपर्यंत पोहोचतात, त्यानंतर पुढील प्रवास महामंडळाच्या एसटी बसने करतात. बोरगाव, उंबरखांड, बोंडेशेत तसेच पेंढरी येथील विद्यार्थीदेखील कळंब, पोशीर पुढे नेरळ येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहेत. मात्र, बोरगाववरून नेरळला जाण्यासाठी वाहनाची सुविधा नसल्याने या विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागतो. खांद्यावर दप्तराचे भले मोठे ओझे घेऊन हे विद्यार्थी दररोज सुमारे एक तास चालत पाच किलोमीटरचा पायी प्रवास करत असतात. परिणामी, या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला नेहमीच उशीर होतो. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तसेच खासगी वाहनाने जाणे खिशाला परवडत नसल्याने विद्यार्थी पायी जाण्याचा मार्ग अवलंबतात. परिणामी, विद्यार्थ्यांची खूप मोठी गैरसोय होते. विद्यार्थ्यांना भर पावसात पायी प्रवास करावा लागतो. दरम्यान, विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी शाळेच्या वेळेवर नेरळ-बोरगाव एसटी सेवा सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

एसटी बस नसल्याने आम्हाला रोज शाळेत जायला उशीर होतो. परंतु, एसटी बस सुरु झाली तर आम्ही शाळेत वेळेवर पोहोचू शकतो.

हर्षल पाटील, विद्यार्थी

एसटी बस सुरु झाली तर आम्हा नागरिकांना याचा खूप फायदा होईल. नेरळला जाण्यासाठी आम्हाला जास्तीचे पैसे लागणार नाहीत, तसेच आमचा वेळदेखील वाचू शकेल.

चंद्रकांत पोसाटे, पालक
Exit mobile version