‘या’ कारणारमुळे रायगड जिल्ह्यातील उद्योग संकटात

। पनवेल । दीपक घरत ।
एमआयडीसीकडून होत असलेल्या अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योग संकटात सापडले आहेत. दैनंदिन उपयोगासाठी लागणारे पाणी उपलब्ध होत नसल्याने अनेकदा कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया बंद ठेवावी लागत असल्याने अडचणीत आलेल्या कारखानदारांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी तळोजा इंडस्ट्रीयलिस्ट असोशियन तर्फे करण्यात आली आहे.

जवळपास साडेनऊशे लहान मोठे कारखाने असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पाणी पुरवठा करण्यात येतो. बारवी धरणातील पाण्याचा वापर याकरीता करण्यात येतो. मागील काही दिवसात धरणातील पाणी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना न पुरवता पनवेल पालिका क्षेत्र तसेच सिडको वसाहतीमधील सदनिका धारकांना पुरवले जात असल्याने पाण्याअभावी औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांची स्थिती गंभीर झाली आहे.

मागील 3 आठवड्यापासून सुरु असलेल्या पाणी टंचाईमुळे कारखान्यातील कामगारांना पिण्यायोग्य पाणी देखील मिळणे अवघड झाल्याने विकतच्या पाण्याने कामगारांना तहान भागवावी लागत आहे. तर कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवता यावी, याकरीता टँकरचे पाणी मागवावे लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक भुर्दंडाचा भार कारखानदारांवर पडत असल्याचे मत संघटनेे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

कारखानदार संकटात
पाणी टंचाईमुळे अनेक कारखान्यानमधील उत्पादन प्रक्रिया बंद ठेवावी लागत आहे. मात्र या कालावधील कामावर असणार्‍या कामगारांचे वेतन सुरूच ठेवावे लागत असल्याने अगोदरच अडचणीत असलेले कारखानदार आणखी अडचणीत सापडण्याची भीती कारखानदारांकडून व्यक्त केली जात आहेत.

……
25 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता
जवळपास 907 हेक्टर परिसरात असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याना दररोज 25 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने ही गरज भागवली जात असून, भोवतालच्या वसाहती व गावांना देखील एमआयडीसीच्या धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

बारवी धरणावर असलेल्या पाणी पुरवठा यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. येत्या काळात हा पुरवठा सुरळीत होईल

अविनाश गाधडे.उपाभियंता. एमआयडीसी
Exit mobile version