संविधानामुळे माणसाला सर्वाधिकार- ॲड. मोरे

| वेनगाव | वार्ताहर |

निसर्गातील झाडा-वेलींना ते इथे वावरणाऱ्या हरएक प्राणीमात्रांना आपले मूलभूत हक्क -अधिकार जोपासण्याचे अधिकार आपल्या राज्यघटनेत दिले आहेत. व्यक्तीला प्राप्त नैसर्गिक सर्व अधिकार संविधान देतो, या सर्व घटकांचे रक्षण भारतीय संविधान करते, म्हणूनच समस्त जगामध्ये सर्वश्रेष्ठ आपली राज्यघटना म्हणजेच आपले भारतीय संविधान होय, असे विचार ॲड. कैलास मोरे यांनी किरवली येथील संविधान जनजागृती कार्यक्रमात मांडले.

26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून बोधिसत्व बुद्ध विहार किरवली येथे भारतीय संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ॲड. कैलास मोरे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तर आदर्श पत्रकार म्हणून आपलं कर्जतचे संपादक विद्यानंद ओव्हाळ, कृषीवलचे प्रतिनिधी अनिल गवळे, महाराष्ट्र माझा यू ट्यूब चॅनलचे संपादक जगदीश दगडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी ॲड. कैलास मोरे म्हणाले की, वंचित लोकांचा सत्कार केल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. देशभरामध्ये भारतीय संविधानाविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे, कारण आज ज्यांना संविधानामधील ‌‘स’देखील माहीत नाही, अशी लोक संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी यादव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्जत रेल्वे पोलीस ठाणे), मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. सम्यक नागसेन सदावर्ते, मुख्याध्यापक राजेंद्र बोराडे, सरकारी वकील गौतम गायकवाड (मुंबई), उमेश गायकवाड (नगरसेवक), ॲड.गोपाळ शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी समता सैनिक दल कॅप्टन विठ्ठल वामन गायकवाड यांच्या स्मरणार्थ कबड्डी खेळातील लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी टी-शर्टचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोधिसत्व बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, राहुल गायकवाड, विजया सोनवणे, किरण गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version