। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी तालुक्यातील गोळप गार्डीवाडी येथील भागामध्ये रविवारी (दि.22) अचानकपणे लागलेल्या आगीत संकेत राडये, संजय राडये व चंद्रकांत सोलकर यांच्या बागांना आग लागल्याने आंब्यांची कलमे होरपळून नुकसान झाले आहे.
गोळप परिसरामध्ये सध्या थंडीची लाट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहर येऊ लागला आहे. त्याचबरोबर वार्याचे प्रमाण चांगल्या प्रकारे असल्याने थंडीही चांगल्या प्रकारे जाणवत आहे. असे असताना आंबा बागातदार आंब्यावर येणार्या मोहरामुळे समाधानी असताना त्यातील अनेक हापूस आंबा कलमे मोहरली होती. दरम्यान, रविवारी दुपारच्या सत्रात वार्याचा वेग सुरू असल्यामुळे अचानकपणे गवताला लागलेली आग तातडीने परिसरामध्ये पसरल्यामुळे या शेतकर्यांना त्यांच्या आंबा बागेमध्ये धाव घ्यावी लागली. अखेर स्थानिक गावकर्यांच्या मदतीने अर्धा पाऊण तासाने आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. परंतु, या आगीत 25 ते 30 आंब्याची कलमे होरपळून 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या वर्षी चांगल्या प्रकारे हापूस आंबा कलमे मोहोरत असल्यामुळे या हंगामात हापूस आंब्याच्या उत्पन्नाला चांगले वातावरण असताना या आगीमुळे आंबा बागातदार चिंतेत पडले आहेत.







