| म्हसळा | प्रतिनिधी |
दिघी- पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेला म्हसळा चेक पोस्ट हा म्हसळा तालुका शहराचा प्रमुख नाका आहे. या ठिकाणी माणगाव, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर व गोरेगावकडे जाणारे महत्त्वाचे राज्य मार्ग एकत्र येतात. तसेच, याच ठिकाणी म्हसळा पोलीस ठाण्याचा चेक पोस्ट देखील कार्यान्वित आहे. मात्र, या महत्त्वाच्या ठिकाणी आजतागायत दिशादर्शक फलक लावण्यात न आल्याने प्रवासी व पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खासगी रस्ते विकासकांनी एमएसआरडीसीमार्फत रस्ता विकसित केला असला तरी, म्हसळा चेक पोस्ट येथे दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनचालकांना योग्य मार्ग ठरवताना संभ्रम निर्माण होतो. या ठिकाणी मार्गदर्शक फलकासाठी खांब उभारण्यात आले असले तरी गेल्या दहा वर्षांपासून त्या खांबांवर कुठला मार्ग कुठे जातो, याची माहिती देणाऱ्या पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत. काही वेळा चेक पोस्टवर पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्याने वाहनचालकांची कुचंबना अधिक वाढते. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन म्हसळा चेक पोस्ट येथे स्पष्ट व योग्य दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी म्हसळा येथील निवासी ग्रामस्थ व स्वयंसेवक प्रसाद जवळे यांनी केली आहे.







