| रोहा | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीचे योग्य नियोजन न केल्याने निधी परत जाण्याची नामुष्की रोहा नगरपालिकेवर ओढवली आहे. नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही वेळ आल्याचा आरोप होत आहे. धावीर मंदिराच्या सुशोभिकरणासाठी राखून ठेवलेला पाच लाख रुपयांचा निधी परत गेल्याने रोहेकर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा नियोजन मंडळाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला जातो. वेळेत नियोजन करून निधी खर्च करणे अपेक्षित असताना नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 2022-23 या वर्षातील धावीर मंदिर सुशोभिकरणाचा पाच लाख रुपयांचा निधी शासनाकडे परत गेला आहे. सदर निधी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मंजूर होता. त्यामुळे 31 मार्चपूर्वी ‘धावीर मंदिर सुशोभिकरण करणे’ कामाला प्रशासकीय मान्यता घेऊन निधीची मागणी करणे अपेक्षित होते, परंतु नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने कुठलेही नियोजन न केल्याने सदर काम रद्द करण्यात आले. मंजुरीच्या आदेश पत्रात तसा स्पष्टपणे उल्लेख केलेला होता. नगरपालिका प्रशासनाच्या ही प्रशासकीय बाब लक्षातच आली नाही.
रस्त्यांच्या कामांचीही दुरवस्था
बांधकाम विभाग सुस्त असल्याने रोहा नगरपालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. सांडपाण्याचा निचरा होणारी गटारे नाहीत. भुयारी गटार योजना भूमिगत झाली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी घेणे-देणे नसलेले बांधकाम विभाग विकासकांना परवानग्या देण्यात मात्र व्यस्त आहे. परवानग्या देताना कुठलेही निकष तपासले जात नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. मागील तीन महिन्यांपासून नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने नगरपालिकेचे प्रशासन निद्रिस्त अवस्थेत आहे.







