सर्व धर्मियांच्या पाठिंब्यामुळे वाघेरेंचे पारडे जड

आ. जयंत पाटील यांनी घेतलेल्या बैठकीचे सकारात्मक परिणाम

। पनवेल । वार्ताहर ।

18 व्या लोकसभेसाठी चौथ्या चरणातील मतदानाच्या प्रचाराची प्रक्रिया थंडावली आहे. मावळमध्ये दोनवेळा खासदारकी उपभोगलेले श्रीरंग बारणे विरुद्ध नव्या दमाचे संजोग वाघेरे पाटील अशी लढत येथे होत आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत जरी असली तरी या लढतीला प्रस्थापित विरुद्ध नवे, उमदे असे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर एकूणच या मतदारसंघाचा आढावा घेतला असता विद्यमान खासदारांना अँटिइंकंबन्सी भोवणार असे चित्र दिसून येते. तर, दुसरीकडे कट्टर शिवसैनिकांच्या परिश्रमाच्या जोरावर आणि सर्व धर्मियांच्या पाठिंब्यामुळे संजोग वाघेरे पाटील यांचे पारडे जड झाले आहे.

संजोग वाघेरे पाटील यांना शिख बांधवांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला आहे. कळंबोली गुरुद्वारा तसेच नवीन पनवेल गुरुद्वारा येथील प्रधानांनी जाहीर पाठिंबा देत तमाम शीख बांधव त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही दिली होती. तसेच, मुस्लिम समाजाच्या बांधवांनी देखील एकदिलाने संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पनवेल मधील मुस्लिम मोहोल्ल्यात घेतलेल्या बैठकीचे अत्यंत सकारात्मक परिणाम जाणवत आहेत. फार मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या बैठकीला उपस्थित होते व संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाचा जयघोष करत तमाम मुस्लिम बांधव त्यांना पाठिंबा देणार असल्याचे आश्‍वासन दिले.

केंद्र सरकारने केलेल्या कामगार विरोधी कायद्यामुळे फार मोठा कामगार वर्ग भाजपा सरकार विरोधात आहे. याचाच प्रत्यय संजोग वगैरे पाटील यांच्या प्रचारादरम्यान देखील आला. कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एक डझन कामगार संघटनांनी संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी उभे राहून त्यांची मशाल निशाणी घरोघरी पोहोचवणार असल्याची शपथ घेतली होती.शिवसेना उपनेते आमदार सचिन आहीर यांच्या अध्यक्षतेखाली तळोजे औद्योगिक वसाहतीमधील हजारो कामगारांनी एकत्र येत संजोग वाघेरे पाटील यांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक करणार असल्याचे जाहीर केले. या व्यतिरिक्त कष्टकरी, असंघटित कामगार, आदिवासी, कातकरी, ठाकूर, बहुजन, उपेक्षित अशा समाजाच्या सर्व स्तरांतून संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांचे पारडे जोड असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अनोख्या क्लुप्त्या लढवत मतदारांचे प्रतिनिधी गुप्त मार्गाने आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत असतात.

Exit mobile version