| गोवे-कोलाड | वार्ताहर |
दिवसेंदिवस गुरे चोरण्याचे प्रकार वाढत असून, रस्त्याच्या बाजूला चरण्यासाठी उभी असणारी उनाड गुरे बघून या गुरांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करुन ती गाडीमध्ये भरून चोरी केल्याच्या घटना घटत आहेत. परंतु, हेटवणे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुरे चोरी करण्याचा प्रयत्न फसला.
शुक्रवार, (दि 29) मार्च रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास राजेश निकम यांनी गाडीतून दोन माणसे उतरून गुरांना चारा घालून इंजेक्शन देऊन गाडी निघून गेली असल्याचे पाहिले. त्यांनी आजूबाजूच्या गजानन मोरे, संतोष निकम, कैलास निकम, विलास निकम, मुकुंद पाटेकर यांना फोन करुन झालेला प्रकार सांगितला. नंतर अर्धा तासांनी बेशुद्ध केलेली गुरे नेण्यासाठी गाडी आली; परंतु गाडी भरण्यासाठी सुरुवात करीत असताना ग्रामस्थ धावून गेले असता. हे गुरे चोरी करणारे गाडीतून पळून गेले. ग्रामस्थांनी दगडफेक केली; परंतु गाडी पसार झाली. दरम्यान, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुरे चोरण्याचा बेत फसला.