‘या’ कारणांमुळे पनवेलच्या जमिनींचा भाव वधारणार

। पनवेल । प्रतिनिधी । 

मुंबई-गोवा महामार्ग, द्रुतगती मार्ग, जेएनपीए महामार्ग पनवेलमधून जात असल्‍याने जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. आता त्‍यात मुंबई-बडोदा महामार्गाची भर पडली आहे. हा महामार्ग पनवेल तालुक्यातील मोर्बे गावात समाप्त होणार असून तेथून पुढे इतर मार्गांना जोडला जाणार आहे. सध्या मुंबई-बडोदा मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोठमोठे प्रकल्‍पांमुळे पनवेलला विशेष महत्त्‍व असून भविष्यात या पट्ट्याचा भाव अधिक वधारणार आहे.

पनवेल हे मुंबई-पुणे या दोन महानगराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच टेकऑफ करणार आहेत. याशिवाय सिडकोबरोबरच अन्य मोठमोठे गृहप्रकल्‍प येऊ घातले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक पनवेलचा कायापालट करण्यात येत आहे. वेगवेगळ्या महामार्गाने हा परिसर जोडला जात असून यात मुंबई-बडोदा महामार्गाची भर पडली आहे.

मुंबई-दिल्ली महामार्गातील दुसरा टप्पा मुंबई ते बडोदादरम्यानही एक्सप्रेस वे उभारला जात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई ते दिल्ली हा १,३८६ किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग उभारला जात आहे. यातील पहिला टप्पा खुला करण्यात आला आहे. याच महामार्गाचा मुंबई ते बडोदा हा दुसरा टप्पा असून या टप्प्याचे काम महाराष्ट्रात सध्या वेगात सुरू आहे.

मुंबई ते बडोदा दरम्यानचा हा महामार्ग ४४० किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गाचे काम दोन टप्प्यात सुरू असून यातील पहिला टप्पा म्हणजे बडोदा ते तलासरी आणि दुसरा टप्पा म्हणजे तलासरी ते पनवेल तालुक्यातील मोर्बे असा आहे. हा महामार्ग पनवेल येथे समाप्त होणार असल्याने साहजिकच या परिसर थेट गुजरात आणि दिल्लीशी जोडला जाणार आहे. पनवेल तालुक्यातून वाहतूक होणार असल्‍याने मोर्बे पट्ट्यातील जमिनींचे भाव वाढले आहेत. या परिसरामध्ये टाऊनशिपच्या दृष्टिकोनातूनही पावले उचलली जात आहेत. त्यानुसार मोठमोठे गृहप्रकल्‍प उभे राहत आहेत.

माथेरानच्या नवरा-नवरी डोंगरात जुळे बोगदे
अंबरनाथ भोज ते मोर्बे येथे दुहेरी बोगद्याचे काम सुरू आहे. मुंबई ते बडोदा एक्सप्रेस वेचे वैशिष्ट्य म्हणजे या महामार्गावर दुहेरी बोगदे उभारण्यात येत आहेत. यातील पहिला बोगदा अंबरनाथमधील भोज ते पनवेलमधील मोर्बेदरम्‍यान आहे. त्याची लांबी ४.१६ किलोमीटर, रुंदी २१.४५ मीटर असून उंची ५.५ मीटर आहे. माथेरान डोंगरांच्या खालून हा दुहेरी बोगदा उभारला जात असून फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली आहे. यातील ४.१६ किलोमीटर भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
दुहेरी बोगद्यासाठी अत्याधुनिक असे एसटीएम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानानुसार बोगद्याच्या दोन्ही बाजूने भुयारीकरणाला सुरुवात केले आहे. बोगद्याचे काम सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन एनएचएआयच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

२०२५ ला मार्ग खुला होणार
मुंबई-बडोदा महामार्ग पनवेलमधील मोर्बे या ठिकाणी संपणार आहे. याठिकाणी टोलनाका आहे. पुढे विरार-अलिबाग महामार्गला द्रुतगती मार्ग जोडला जाणार आहे. २०२५ ला हा रस्ता खुला होणार असून पनवेल-कल्याण-अंबरनाथ अंतर कमी होईल.महामार्गामुळे मोर्बे पट्ट्याचा व्यावसायिक क्षेत्र म्‍हणून विकास होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version