अवकाळी पावसाने मुरूड जंजिर्‍याला शुकशुकाट

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
शनिवार आणि रविवार दोन दिवस पर्यटक प्रचंड संख्येने मुरूड समुद्र किनार्‍यावर आले होते. मात्र विजेच्या गडगडाटासह वादळी पावसाचा सातत्याने इशारा देण्यात आल्याने अनेकांनी रविवारी रात्रीच आपापल्या घराकडे कूच केल्याचे दिसून आले. त्यामुळे सोमवारी समुद्रकिनार्‍यावर मात्र शांतता दिसून येत होती. मुरूड येथील साई-आरती गेस्ट हाऊसचे मालक ममोहर बैले, यांनी सांगितले की, अवकाळी पावसाचा मोठा परिणाम पर्यटनावर झालेला दिसून आला. रविवारी सायंकाळी पर्यटक परत जाण्यास निघाले. पावसाचा 21-22 नोव्हेंबरचा इशारा मिळताच पर्यटकांची चुळबुळ सुरू झाल्याचे दिसत होते. मुरूडमध्ये 36 गेस्ट हाऊस आहेत. यापैकी सोमवारी मात्र 2 ते 3 ठिकाणीच मोजकेच पर्यटक दिसत असल्याचे समजले. रविवारी रात्री उशिरा तास-दीड तास पाऊस पडला. वादळी वार्‍याची तीव्रता मात्र नव्हती. यावेळी मनोहर बैले म्हणाले की, जागतिक मच्छीमार दिनानिमित्त ते रविवारी हर्णे, जिल्हा रत्नागिरी येथे गेले होते. तेथे मात्र मुसळधार वादळी वार्‍यासह पाऊस पडल्याने स्थानिक पर्यटकांची समुद्रकिनारी तारांबळ उडून पांगापांग झाली. तेथील मासेमारी नौकादेखील तातडीने किनार्‍यावर आणण्यात आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मुरूड जंजिर्‍याच्या समुद्रात रविवारी देखील शांतता दिसून येत होती. सोमवारी सायंकाळी किनार्‍यावर पर्यटकांऐवजी क्रिकेट खेळणारी मुलेच आधिक दिसत होती. काही स्थानिक मंडळी मोजक्याच संख्येने दिसत होती.घोडागाडी, जलक्रीडेसाठी असणारी साधने सुर्यास्ताच्या प्रकाशात एका जागी ठप्प दिसत होती. अवकाळीने केवळ पर्यटनावरच परिणाम केलेला नसून येथील कापलेल्या भातशेतीची देखील दैना उडविली आहे.

Exit mobile version