| तळा | वार्ताहर |
तळा भूमिअभिलेख कार्यालयात रिक्तपदांमुळे अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांमधून असमाधान व्यक्त करण्यात येत आहे. महसुलीचे महत्वाचे कार्यालय समजल्या जाणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून अनेक पदे रिक्त आहेत. तालुकानिर्मिती नंतर जवळपास दहा वर्षानंतर हे कार्यालय स्थापन झाले तेव्हापासून रिक्त पदे भरली गेली नसल्याने त्या पदांचा भार इतर कर्मचाऱ्यांवर येतो. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा निपटारा होत नसल्यामुळे नागरिकांना एका कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. सदर कार्यालयात मोजमापणी, फेरफार, वारसनोंद, फेरबदल, नकाशा, जुनी कागदपत्रे, व इतर अनेक कामे केली जातात. जमीन मोजणीचे पैसे भरून देखील सहा-सहा महिने कामे होत नसल्यामुळे जनतेला मनःस्ताप सहन करावे लागत आहे.
या कार्यालयात दिवसेंदिवस कामाची प्रकरणे वाढत असून मंजूर 13 पदांपैकी सद्यस्थितीत भुकरमापक एक, नगर भुमापक लिपिक, अधिलेखपाल, निमतांदार हे चारच पदे कार्यरत आहेत. त्यामुळे उर्वरित रिक्तपदे लवकरात लवकर भरण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.