‘दिगंबरा’च्या जयघोषात दुमदुमली चौलनगरी

भक्तांनी याचि देही याचि डोळा अनुभवला पालखी सोहळा
| चौल | प्रतिनिधी |
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात चौल-भवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरातून दत्तमहाराजांच्या पादुकांवर अभिषेक घालून पालखी परिक्रमणेला गुरुवार, दि. 1 डिसेंबर रोजी दुपारी सुरुवात झाली. विशेष म्हणजे, या परिक्रमेत ना टाळांचा नाद घुमत होता, ना मृदुंगाचा गजर होता, फक्त एका सुरात दत्तनामाचा जागर अव्याहतपणे सुरु होता. त्यामुळे परिक्रमेचा मार्ग दुमदुमून जाऊन वातावरण भक्तीमय झाले होते. यावेळी शेकडो दत्तभक्त या पायी परिक्रमेत सामील झाले होते.

वार्डे गुरुजी आरती मंडळ, चौल यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या प्रतिमेची पायी परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. यावर्षीचे पालखी परिक्रमेचे हे तिसरे वर्ष होते. त्याचे सर्व आरती मंडळास जाते. या पालखी परिक्रमणेत शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला पायी प्रदक्षिणा घालण्यात आली.

दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष, पादुका आणि मूर्तीवर होणारी पुष्पवृष्टी, मंदिरात केलेली विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट आणि याची देही याची डोळा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर जमलेली भाविकांची गर्दी अशा भक्तिमय वातावरणात दत्तमहाराजांच्या प्रतिमेची पायी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक स्वामी समर्थ मंदिरमार्गे, पुढे सराई, सोमेश्‍वर मंदिर, हनुमानपाडा अशी मार्गक्रमणा करीत भवाळे येथून दत्तमंदिरात सायंकाळी सहाच्या सुमारास प्रस्थान झाली. या मिरवणुकीने संपूर्ण चौल परिसर दुमदुमून गेला होता. पायी परिक्रमणेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मंदिरात महाआरती झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. महाप्रसादाच्या आस्वादाने भाविक कृतार्थ झाल्याचे पाहावयास मिळाले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्तमंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आशिष वासुदेव, सचिन राऊत आणि वार्डे गुरुजी आरती मंडळ चौलचे सभासद यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दत्तभक्तांनी मेहनत घेतली. यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, चौल ग्रा.पं. उपसरंपच अजित गुरव, सदस्य निलेश नाईक आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
चौकट…
विशेष सत्काराचे आयोजन
पायी परिक्रमेचे हे सलग तिसरे वर्ष असून, याहीपुढे हा सोहळा दरवर्षी अखंडितपणे सुरु राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. दत्तभक्तांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा सोहळा यशस्वी पार पडला. मंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आरती मंडळाचे संस्थापक वार्डे गुरुजी यांचे सुपुत्र रमेश वार्डे, सिद्धेश्‍वर मंदिराचे महंत तसेच नवनाथ मठातील बुरांडे बाबा आणि राम मठातील पाटील माई यांचा विशेष सहकार्याबद्दल मंडळाकडून सत्कार करण्यात आला.

Exit mobile version