। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि.17) आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. या निमित्त जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा, हातात टाळ मृदूंग, लेझीम घेऊन हरिनामाचा जप करीत गावागावात दींडी काढली होती. यातून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई व इतर संताची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले. तसेच, विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. जिल्ह्यात मंगलमय वातावरणात हा सोहळा साजरा करण्यात आला.
आषाढी एकादशीनिमित्त अलिबाग-वरसोली येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणार्या विठ्ठल रखूमाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था इंग्लिश मीडियम स्कूल मोरा तालुका उरणच्यावतीने आषाढी एकादशी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्त भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रति पंढरपूर ओळख असणारी मुरूड शहरातील जुनी पेठ येथील 200 वर्षे पुरातन श्री भैरव विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. यावेळी मंदिराच्या बाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शालेय विद्यार्थीमध्ये लहान वयातच भक्तिभावाची भावना वाढीस लागावी, मुलांना टि.व्ही मोबाईलपासून दूर करून भक्तिमार्गात आणावे तसेच त्यांचे आभ्यासाकडे लक्ष वळवावे या उदात्त हेतूने पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा या शाळेतील शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन समितीने पेण शहरातून दिंडी काढली होती.
कै.पू.न. गोडसे विद्यामंदिरात शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल रखामाई आणि वारकरी विद्यार्थी विद्यार्थीनींसोबत दिंडीचे प्रस्थान झाले. संपूर्ण गावातून हरिनामाचा गजर करत भक्तीगीते म्हणत टाळ मृदुंगाच्या आवाजाने संपूर्ण गावत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
पनवेल शहारातील शिंपी समाजाचे दीडशे वर्ष जुने असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाकरिता भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
आषाढी एकादशी निमित्त पनवेल मधील वसुंधरा फॉउंडेशनने पनवेल परिसरात वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहान मूलं विठ्ठल रखुमाई बनले होते. तसेच, दिंडी मधील खेळ खेळण्यात आले होते.
अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशनल ट्रस्टचे शारदा मंदिर मराठी माध्यमाच्या दहिवली येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात एकादशीच्या दिवशी शाळेतील विद्यार्थी भजन, टाळ, मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाले. यावेळी परिसरातील भाविक सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आषाढी एकादशीनिमित्त यंदा प्रथमच श्रीवर्धन येथील भजनी मंडळाच्या महिलांनी वैशिष्ट्यपूर्ण दिंडी काढली होती. श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून प्रारंभ होऊन नारायण पाखाडी-चौकर पाखाडीमार्गे मूळगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात दिंडीची सांगता करण्यात आली.
संस्कारक्षम वयातच मुलांना रुढी तसेच परंपराचा परिचय व्हावा, या उद्देशाने सानपाडा येथील डिझनी किड्स प्रे प्रायमरी स्कूलतर्फे वारीचे आयोजन करण्यात आले होते. यात चिमुकल्या वारकर्यांनी त्यांच्या शिक्षकांसह पालकांनी उत्साहाने भाग घेतला होता.
आषाढी एकादशीच्यानिमित्ताने कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील मराठी माध्यमाच्या नेरळ विद्या भवन माध्यमिक विद्यालयाच्यावतीने शाळा ते ग्रामदेवता मंदिर येथे धामोते पंचक्रोशीत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या भिलजी-बोरघर येथील श्रीमती बामिबाई नाना पुनकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली होती.
आषादी एकादशी निमित्त पनवेलच्या वि.खे.हायस्कूल शाळेतील विद्याथ्यांची दिंडी काढण्यात आली होती. यावेळी विठू माऊलीचा गजर सर्वत्र दरवळत होता.
वारकर्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या शिशुमंदीर, प.पू.गगनगिरी स्कूल, इंग्लिश स्कूल तसेच जनता पूर्व प्राथमिक शाळेत विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी पालखी सोहळ्यात आकर्षण ठरले आहे.
कर्जत शहरातील कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर या शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे काढण्यात आली. माऊलीचा गजर करून वारकरी वेशातील विद्यार्थ्यांच्या अभंगवाणीने अवघे कर्जत शहर दुमदुमले होते.
मुरूड तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीत आषाढी एकादशी निमित्त वेशभूषा करून निघालेली मुला-मुलींची वारी.
नागोठण्यातील श्री ज्ञानेश्वर व विठ्ठल रूक्मिणी मंदिरात बुधवारी आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त येथील संत सेवा मंडळाच्यावतीने ज्ञानेश्वर मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.