रायगडात दुमदुमला विठूनामाचा गजर

। रायगड । वार्ताहर ।
विठ्ठल-रखुमाईची भक्तीभावाने केलेली पूजा, विठूनामाचा गजर आणि ठिकठिकाणी शाळकरी मुलांच्या काढण्यात आलेल्या दिंड्या अशा उत्साही आणि भक्तीपूर्ण वातावरणात रायगड जिल्ह्यात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी पाहावयास मिळाली. अनेक मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक शाळांना सुट्टी असल्याने आदल्या दिवशी म्हणजे शनिवारीच विठूनामाच्या गजराने शहरातील शाळा दुमदुमल्या होत्या. बालवारकर्‍यांनी हातात टाळ, मृदुंग घेऊन विठूनामाचा जयघोष केला. तसेच वारी, रिंगण सोहळे, पालखीचे कार्यक्रम, अभंगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्साहात केले.

पालीत चिमुरड्यांची वारीमध्ये पारंपरिक वेशभूषा
पालीतील उंबरवाडी व बेघरआळी अंगणवाडीत शनिवारी (ता.9) एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली होती. यावेळी चिमुरड्यांनी पारंपरिक वेशभूषेत वारी व दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. हे लहानगे आपल्या शिक्षकांसोबत नाचत गाजत वारीत सहभागी झाले होते. यावेळी कोणी हातात विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेतली होती. कोणी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली होती. तर कोणी हातात टाळ घेतले होते. पारंपरिक वेशभूषेतील ही चिमुरडी मुले खूप गोड दिसत होती. तेही खूप आनंद लुटत होती. अंगणवाडी सेविका साक्षी फोंडे व मदतनीस अपर्णा भगत यांनी या दिंडीचे यशस्वी नियोजन केले होते. तर, यासाठी पालकांनीसुद्धा विशेष सहकार्य केलं.


रसायनीतविद्यार्थ्यांकडून भजन, अभंगांचे गायन
विद्या प्रसारिणी सभा चौक, संचलित प्राथमिक विद्यामंदिर व शिशूमंदिर चौक शाळेमध्ये शनिवारी आषाढी एकादशी कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश देशमुख व संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शाह उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका व प्राथमिक विद्यामंदिर व शिशु मंदिरच्या मुख्याध्यापिका सुलभा मॅडम तसेच प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिरचे समन्वयक देवानंद कांबळे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी मॅडम यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्रति विठूमाऊली व रखुमाईच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद कांबळे यांनी केले. इयत्ता चौथीच्या मुला-मुलींनी ज्ञानोबा माऊली तुकाराम गजर जप करून काही विद्यार्थिनींनी फुगड्यादेखील घातल्या. इयत्ता तिसरीची सावी शिंदेंचे अभंग, सिद्धी गावडे हिने हरिपाठ, प्रथम ठोंबरेने विठ्ठलाची आरती, वरद घुमरे, प्रचिती देशमुख, चिन्मयी भोईर, चैतन्या भोईर यांनी पसायदान, पियांशी ठोंबरे हिने हरिपाठ, चैतन्या भोईर, चिन्मयी भोईर, मनाली सावंत, पूर्वी येरुणकर, आरोही जाधव, मुग्धा ठोंबरे या मुलींनी हरीपाठातील अभंग गायले. त्यांना मयुरेश भोईर व धीरज गायखे या दोघांनी त्यांना पकवाज व ढोलकीची साथ दिली. सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिरच्या प्रांगणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर हेड उल्का धुरी दिंडीमध्ये उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता दीपक शिंदे यांनी आभार प्रदर्शनाने केली.

रसायनी………………….

पेणमध्ये विठूनामाच्या गजरात दुमदुमली पेणनगरी
बाळगोपाळांनी विठ्ठल नामाचा गजर करून पेणकरांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले. विठ्ठल नामाची शाळा भरली। विठूचा गरज हरिनामाचा झेंडा रोविला। ज्ञानोबा माऊली तुकाराम। अशा प्रकारच्या भजनांनी दिडींची शोभा वाढवली. या दिंडीसाठी विद्यार्थ्यांनी वारकरी सांप्रदायाचे पोषाख परिधान केले होते. तर काही विद्यार्थी विठ्ठल-रखुमाई, तुकाराम, नामदेव, एकनाथ, राधा-कृष्ण तर काही विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन तर काहींनी ज्ञानेश्‍वरी ग्रंथ घेतले होते. या दिंडीमध्ये ज्ञानेश्‍वरी व हरिपाठ ग्रंथाचाही समावेश होता.

पेण तालुक्यातील पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळा, नेने कन्या विद्यालय, सुमंगल मतिमंद व बहुविकलांग मुलांची शाळा, सुबोध विद्यालयल पेण आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी तसेच संत सेवा मंडळ पेण यांनी विठू माऊलीची पालखी खांद्यावर घेऊन पेण शहरात दिंडी काढली. त्यामुळे सारी पेणनगरी विठू माऊलीच्या गजराने दुमदुमली होती. या दिंड्यांमध्ये संस्था चालकांनीदेखील भाग घेतला होता. तर संत सेवा मंडळाच्या पालखी सोहळ्यामध्ये पेण शहरातील अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली होती. या पालखीचे भव्य स्वागत महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद वनगे व त्यांच्या सहकार्‍यांकडून करण्यात आले. पेण एज्युकेशन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लेखा ठाकूर, शिक्षिका अपर्णा वाघमारे, सुषमा साखरे, कविता पेडणेकर, गीता म्हात्रे, कमला पाटील, रुचा परांजपे, शिक्षक मिलिंद वारगुडे, धनाजी घरत यांनी मेहनत घेऊन बालगोपाळांच्या दिंडीचे आयोजन केले होते

पेण……

पाताळगंगा येथे एकादशीनिमित्त विद्यार्थी झाले वारकरी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विमलाताई पारनेरकर सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यामंदिर वाशिवली या शाळेत शिकत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. कारण, वारकरी ज्या भूमिकेतून पंढरपूरला जात असतो. तशीच वस्तू स्थिती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निर्माण केली होती. या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा विठूरायाबद्दल विश्‍वास आणि श्रद्धा पाहून जमलेले नागरिक थक्क झाले होते. विविध प्रकारची वेशभूषा आणि डोक्यावर तुळस आणि मस्तकी पांडुरंगाचा बुक्का लावून विद्यार्थी वारकरी पंढरपूरला निघालेत की काय? असा भास सर्वजण व्यक्त करीत होते.

शाळेचे संस्थाध्यक्ष तुळशीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका मीनाक्षी रणदिवे, सहशिक्षक कल्पना गव्हाणे, वारगुडे सर, संजीवनी म्हात्रे या शिक्षकांनी मुलांच्या पायी दिंडीचे आयोजन केले होते. यावेळी शांताराम पारींगे (पालक) यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.

पाताळगंगा…….

वव्हाळ येथे दिंडीचे आयोजन
वव्हाळ येथे दि. 9 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आयोजन आयोजन करण्यात आले होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी वव्हाळ येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला. प्रथम विठ्ठल रुक्माई मंदिरात पूजा करून दिंडीला सुरुवात करण्यात आली. ही दिंडी संपूर्ण वव्हाळ गावात काढण्यात आली. यावेळी मुलांनी विविध वेशभूषा केली होती. यामुळे येथील वातावरण विठ्ठल भक्तीमय झाले होते. या दिंडीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र पाटील, जगदीश पारिंगे, संजय घरत, गणेश पाटील, उदय ठोकर तसेच पुरुष, महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वव्हाळ……………………

‘दुधे विटेवरी’ झाली विठ्ठलमय
करंजाडे वसाहत परिसरात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्समधील विठ्ठल रुक्माई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता.
आषाढी एकादशीनिमित्त पहाटे विठ्ठल रुक्माई मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सोसायटीच्या सर्व धर्मीय लहान मुलं आणि मुलींनी विठ्ठलाच्या वारीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व महिलांनी फुगडी आणि रिंगण करुन टाळ वाजवून विठ्ठल नामाचा गजर केला. तसेच भजन, हरिपाठ, महाआरती आदी कार्यक्रम पार पाडण्यात आले.

करंजाडे………….

उरणमध्ये रांगोळीतून साकारला सावळा विठ्ठल
आषाढी एकादशीचे औचित्य साधत उरण शहरातील सर्पमित्र, उत्कृष्ट चित्रकार, साईनबोर्ड आर्टिस्ट राजेश नागवेकर (रघु पेंटर) यांनी रांगोळीमधून विठूरायाची व वारकरी यांची हुबेहूब कलाकृती साकारली.

मनातील भावना, आदर, निष्ठा, एकाग्रता या सर्व गोष्टींची योग्य सांगड घालून आपल्या कलेबाबत एकनिष्ठता अशा कलेमधून दिसत असते. उरण शहरातील चित्रकार राजेश नागवेकर यांनी रांगोळीद्वारे साकारलेली कलाकृती ही साक्षात प्रत्यक्षात फोटोसारखी हुबेहूब विठूरायाची व वारकर्‍यांची प्रतिकृती दिसून येत आहे. राजेश नागवेकर यांच्या या कलाकृतीचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक पेंटींग व रांगोळीद्वारे आपली कलाकृती सादर केली आहे. दरम्यान, ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना चार ते पाच दिवसांचा अवधी लागला.

उरण………………….

मुरुडमध्ये विठ्ठलनामाचा घुमला जयघोष
मुरूड तालुक्यातील हजारो विठ्ठल भक्तानी विठूरायाचा जप करत वारकरी प्रति पंढरपूर ओळख असणारी मुरुड -जुनीपेठ येथील श्री काळभैरव विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेला पहाटे सुरुवात झाली दुग्धाभिषेक आणि विविध लेप लावून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला स्नान घालण्यात आलं. त्यानंतर दोन्ही मूर्तींना सुंदर वस्त्र परिधान करण्यात आली. तुळशीहार आणि फुलांच्या माळांनी विठुरायाला सजवण्यात आलं. खास अलंकृत दागिने आणि वस्त्र घालून विठ्ठल-रुक्मिणीची पूजा संपन्न झाली. यावेळी सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या पुजेचा मान कुंभार वाड्यातील दिनेश भोईर व त्याच्या पत्नी रंजना भोईर यांना मिळाला.पहाटे काकड आरती व महापुजा आरती झाल्यानंतर मंदिर सर्वासाठी खुले राहणार आहे.पंचक्रोशी भागातील एकमेव मंदिर असल्यामुळे विठ्ठलाच्या ओढीने टाळ-मृदंगाच्या तालावर विठुरायावाड्यातील चा जयघोष करत विठ्ठलच्या चरणी नसमस्तक झाले .यामुळे मंदिरात भक्तीचे वातावरण पसरलेले बघायला मिळते असते. येणार्‍या विठ्ठल भक्तांना तिर्थ प्रसादचे आयोजन मंदिर समितीकडुन करण्यांत आले आहे.

मुरुड……………..

मजगावमध्ये संगीत भजन सोहळा
मजगाव येथील आगरी समाज यांच्या विद्यमाने आषाढी एकादशी निमित्ताने आज संगीत भजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.सदरचा भजन सोहळा मजगाव येथील विठ्ठल मंदिरात ठेवण्यात आला होता.

.यावेळी गुरुवर्य भगवान लोकरे यांचे शिष्य बुवा श्री शंकर रामचंद्र राऊत यांच्या सुमधुर आवाजात विठ्ठलाचे विविध अभंग भारुड गवळणी रूपकसादर करण्यात आले.सदरील कार्यक्रमासाठी मजगाव गावातील अनेक महिला व ग्रामस्थ यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.यावेळी विठ्ठलाची दिंडी सुद्धा काढण्यात आली होती.अनेक लोकांनी या प्रसंगी वेशभूषा परिधान केली होती.यावेळी बुवा शंकर राऊत यांनी भजन व वारकरी संप्रदायातील संतांचे अभंग भारूड उत्कृष्ठ पणे सादर केले. त्यांना साथसंगत म्हणून पखवाजवादक केशव महादेव राऊत तसेच सागर राऊत यांनी केले.तसेच प्रकाश राऊत यांनी टाळ व चकवा वादन केले. उत्कृष्ट कोरस आणि झा़ंज वाजवून जनार्दन मोरे यांनी प्रेक्षकांची मन जिंकली.

खोपोलीतील धाकटी पंढरीत भक्तांची मांदियाळी
धाकटी पंढरी ताकई मंदिरात रविवारी आषाढी एकादशीचा अनुपम सोहळा उत्साहात संपन्न झाला.तब्बल दोन वर्षानंतर झालेल्या या सोहळ्यात जवळपास 15 हजाराहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. जणू एकादशीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. खोपोलीतील डॉ.हेमंत पाटील आणि पत्नी डॉ.रोहिणी हेमंत पाटील यांच्यासह डॉ.निकेत अनंता पाटील, कल्याणी कुलदिपक शेंडे यांच्यासह कुटूंबाला मिळाला असून सहकुटुंबांने विठूरायाची महापूजा पहाटे केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले.

विठोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अनंता पाटील,सेक्रेटरी नारायण पाटील, उपाध्यक्ष जयवंत पाटील,सदस्य अ‍ॅड.रामदास पाटील,संजय पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी सकाळपासून नियोजन केले होते.तर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

श्री क्षेत्र तळवली ते खांब पायी दिंडी सोहळा संपन्न
रोहे तालुका खांब पंचक्रोशी वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री.क्षेत्र तळवली ते खांब पायी दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न करण्यात आला.
वै.गु.अलिबागकर महाराज,गोपाळबाबा वाजे व धोंडूबाबा कोलाटकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खांब पंचक्रोशीतील वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने गेली अनेक वर्षांपासून दरवर्षी आषाढी एकादशीला श्री.क्षेत्र तळवली ते खांब विठ्ठल-रखुमाई मंदिरापर्यन्त हा पायी दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे.त्याच परंपरेने या वर्षीचा हा आषाढीचा सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न करण्यात आला.

Exit mobile version