। पालघर। प्रतिनिधी।
वसई पूर्वेच्या वाघरळ पाडा येथे माती वाहून नेणारा डंपर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपर मालकाचा दुदैवी मृत्यू झाला आहे.
मंगळवारी (दि.6) संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. वसई पूर्वेच्या वाघरळ पाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यासाठी मातीचा भराव केला जात आहे. मंगळवारी एक माती वाहून नेणारा ट्रक निर्मला शाळेजवळ पलटी झाला. यावेळी या डंपरचा मालक जाकीर खान तेथे उभा होता. तो डंपरखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. चालक मद्याच्या नशेत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ज्या ठिकाणी अपघात घडला तो वर्दळीचा रस्ता असून सुदैवाने यावेळी कुणी नसल्याने इतर जीवितहानी टळली आहे.







