| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा शहराचे पर्यायी मार्गावरील दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक करणार्या वाहनांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत असलेली बॉक्ससाईड (मायनिंगमिश्रित माती) वाहतूक श्रीवर्धन-माणगाव मार्गे राष्ट्रिय मार्गावरून अवजड वाहनाने करण्यात येत आहे. वाहतुकीस वापरातील गाड्या त्यांचे वाहन चालक व मालक पैशाच्या हव्यासपोटी अवजड वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत नसल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.
माहे मार्च व एप्रिल महिन्यात अवजड वाहतूक करणार्या वाहनांचे पाठोपाठ पाच अपघात घडले आहेत. दरम्यान, श्रीवर्धनकडून बॉक्ससाईडने खचाखच भरलेला अक्षय ट्रान्सपोर्ट डंपर क्रमांक एमएच -46- बीएफ -1688 सकलपचे उतार उतरत असताना ज्या घटनास्थळी अपघातांची मालिका सुरूच आहे, त्याच ठिकाणी रस्त्याच्या मधोमध कलंडला आहे. या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी अपघाताची गंभीरता लक्षात घेता दैवयोगाने जीवितहानी टळली आहे, तर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचे वृत्त समजताच म्हसळा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व मदतकार्य केले.