। पाली । वार्ताहर ।
आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाला महत्व आहे. दसर्याला धार्मिक महत्वासोबत आपल्या शेतकर्यांच्या घरातील कडधान्याचे बीज परीक्षण करण्यासाठी घट बसविणे खूप उपयोगी व गरजेचे आहे. याचा अवलंब शेतकर्यांनी करावा व दसरा सणाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्यातील रावण म्हणजे वाईट गोष्टींचा नाश करून एक चांगला माणूस बनण्याचा संकल्प करावा, असे आवाहन सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी केले आहे.
मराठा समाजाचा दसरा मेळावा शनिवारी (दि.12) पालीतील मराठा समाज भवनातील स्व.स.स.साजेकर सभागृहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी समाज बंधू भगिनींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हा दिवस सिमोल्लंघनाचा दिवस आहे. समाज वेगवेगळ्या क्षेत्रात सिमोल्लंघन करत आहे. समाजातील अनिष्ट चाली-रिती बंद करून काही नवीन बदल करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्व समाज बंधू-भगिनींनी सहकार्य करावे व समाजाला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष गणपत सितापराव, खजिनदार योगेश मोरे, कवी जाधव व जयश्री जाधव यांच्यासह झाप विभागातील पाली-वरचा देऊळवाडा येथील सर्व मराठा बांधव उपस्थित होते.






