धुळीचे कण नाका-तोंडात

प्रवाशांसह चालक, पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

माती, खडी टाकून खड्डे बुजविण्याचा दिखावा अलिबाग-रोहा मार्गावर करण्यात आला. परंतु, धुळीचे कण नाका-तोंडात जात आहेत. त्यामुळे प्रवाशांसह चालक व पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या गलथान कारभारामुळे खोकला, सर्दी, घसा दुखण्यासारखे आजार वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्यांचे काम मागील चार वर्षापासून प्रलंबित आहे. या रस्त्याचे काम अपूर्ण स्थितीत आहे. अलिबाग ते सुडकोली मार्गावर ठिकठिकाणी पावसाळ्यापुर्वी खड्डे पडले होते. पावसाळ्यात माती, खडी टाकून खड्डे बूजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभामार्फत करण्यात आले. पावसाळ्यात चिखलातून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. अलिबाग रोहा रस्त्यांवर वाहनांची वर्दळ आहे. या वर्दळीमुळे रस्त्यांवरील खडी मातीची धुळ उडत आहे. या धुळीचे कण अनेकांच्या नाका तोंडात जात आहे. त्यामुळे काही जण नाक दाबून तर काही जण तोंडाला कपडा बांधून प्रवास करीत आहेत. दुचाकी चालकासह तीन चाकी, चार चाकी या खासगी वाहनांंसह सरकारी वाहनांमधील चालकांना आणि पादचारी प्रवाशांना या धुळीचा त्रास होत आहे. अनेकांना श्वसनाचे आजार निर्माण होण्याची भिती निर्माण झाली असून काहींना सर्दी, खोकला, घसा दुखण्याचे आजार होऊ लागले आहे. सरकारी दवाखान्यांसह खासगी दवाखान्यात या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यात चिखलातून प्रवास करत असताना आता माती धुळीचे कण खात प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. मात्र रस्ते स्वच्छ व माती मुुक्त करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन ठरत आहे.

दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी नागरिकांची ये-जा सुरु झाली आहे. तसेच पर्यटकही त्यांच्या वाहनांमधून या मार्गावरून प्रवास करीत आहेत. परंतु, मातीचे कण व धुळीमुळे प्रवास करणे नकोसे झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रवासी वर्गाकडून देण्यात आला आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्ते दुरुस्त करण्याच्या सुचना ठेकेदाराला दिल्या आहेत. त्याबाबत लेखी पत्र दिले आहे. लवकरच रस्त्यांची योग्य दुरुस्ती केली जाईल.

– मोनिका धायतडक, कार्यकारी अभियंता

धुळीचे कण नाका तोंडात गेल्यास श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे. घसा दुखणे, खोकला येणे अशा अनेक प्रकारचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

– डॉक्टर (नाव न सांगण्याच्या अटीवरून)

Exit mobile version