तापमानात मोठी घट
। मुंबई । वृत्तसंस्था ।
सौराष्ट्राकडून धूलिकण घेऊन आलेल्या वार्यांमुळे मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठया प्रमाणावर धूळीकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या दहा वर्षांतील मुंबईतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली असून, सहा ते सात अंशानी कमाल तापमानात घट झाली होती. मुंबईतील अंधेरी, विलेपार्लेसह काही भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. त्याचवेळी सौराष्ट्रावरून येणार्या वार्यांसह वाहून आलेले धूळीकण मुंबईच्या वातावरणात मिसळले. दिवसभर त्यांचा प्रभाव मुंबईत जाणवत होता. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. येता काही काळ हवेतील धूलिकण कायम राहणार असून तापमानातही घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागांवर धूळ आणि धुक्याचे मळभ निर्माण झाले. वाढलेल्या आद्र्रतेतून निर्माण झालेले धुके आणि धूळ वाढवणार्या वेगवान वार्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ही स्थिती ठळकपणे जाणवली.
हवेतून येणार्या बाष्पामुळे मुंबई परिसरासह कोकण विभागात आणि उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम मध्य महाराष्ट्रात गेले दोन दिवस पावसाळी वातावरण होते. मुंबई आणि कोकणात काही भागांत हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश भागांत या कालावधीत ढगाळ वातावरण होते. शनिवारी रात्रीपासून आद्र्रतेत वाढ होत गेली. त्यामुळे मोठया प्रमाणावर धुके निर्माण झाले. कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्रात काही भागांत रविवारी सकाळपासून धुक्याची स्थिती होती. रविवारी सकाळी उत्तर कोकणाच्या बहुतांश भागांत धूळ वाढवणारे वारे वाहत होते. मोठ्या प्रमाणावर धुके आणि धूळ वातावरणात मिसळल्याने दृश्यमानता कमी झाली होती. अनेक ठिकाणी आकाश धुरकट दिसत होते. सौराष्ट्राकडून आलेले धूलिकणयुक्त वारे आणि त्याच वेळी मुंबईत सुरू झालेली पावसाची रिपरिप यामुळे रस्ते, वाहने यांच्यावर पांढर्या, राखाडी वाळुकणांचा थर साचला होता. विलेपार्ले पूर्व येथील पार्ले मार्केट, सुभाष मार्ग, महात्मा गांधी मार्ग, हनुमान मार्ग येथे सकाळी 9 वाजता पांढर्या, करड्या रंगाची राख आढळली, अशी माहिती जवाहर बुक डेपोत काम करणारे दीपक कडू यांनी दिली. तर हळूहळू ऊन पडू लागल्यावर त्याचे प्रमाण कमी झाले, असे पार्ले पंचमचे श्रीधर खानोलकर यांनी सांगितले.
हवामानाचा अंदाज
राज्याच्या बहुतांश भागांत कडाक्याच्या थंडीची चिन्हे आहेत. उत्तरेकडील राज्यांच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होणार असून तेथील थंड वारे दाखल होऊन किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होणार असल्याने थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
