| उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शासकीय नियमांची पायमल्ली करून माती व डेब्रिज भरलेल्या डंपरची वाहतूक सुरू आहे. त्यामुळ रस्त्यावर धूळीचे साम्राज्य तयार झाले आहे. या धूळ आणि खड्ड्यांचा सामना करीत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनानंतर पुन्हा एकदा तोंडाला मुखपट्टी लावून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. रस्त्यावरील वाढणारे प्रदुषण टाळण्यासाठी रस्त्यावर पसरणारी माती हटविण्यात यावी. यासाठी हातात फलक घेऊन शेकापक्षाचे युवा तालुकाध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी अनोखे आंदोलन छेडले आहे.
उरण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरून दररोज हजारो अवजड वाहनांची ये-जा असते. या अवजड वाहनांच्या तुलनेत ग्रामीण भागातील बांधलेले रस्ते हे कमकुवत व निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे रस्ता तयार केल्यानंतर काही महिन्यातच या रस्त्यांवर खड्डे पडतात. अशा खड्ड्यातून मार्गक्रमण करणार्या वाहनांमुळे धुळीचे कण हवेत पसरत आहेत. त्यात सध्या तालुक्यातील सर्रास रस्त्यावरुन माती, डेब्रिज भरलेल्या डंपरची वाहतूक शासकीय नियमांची पायमल्ली करून सुरू असल्याने रस्त्यावर सांडणारी व हवेत पसरणारी माती प्रवासी, वाहनचालकांच्या नाका-तोंडात जाऊन नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असून अनेक नागरिकांना सर्दी, खोकल्याबरोबर दम्यासारख्या आजारांनी ग्रासले आहे.
उरण तालुक्यातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी आणि ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच, रस्त्यावर पडणारी माती हटविण्यासाठी शेकापचे युवा तालुकाध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी रस्त्यावर अनोख्या स्वरुपाचे आंदोलन उभारुन निद्रिस्त प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.