वाहनचालकांसह नागरिक त्रस्त
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाच्या लांजा शहरातील रखडलेल्या कामामुळे सध्या शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास वाढला आहे. परिणामी वाहनचालक, नागरिक आणि विद्यार्थी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. प्रचंड धुळीने श्वसनाचे आजारही होण्याची शक्यता आहे.
लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. शहरातील कुंभारवाडा, बसवेश्वर चौक, बाजारपेठ, साठवली फाटा या ठिकाणी महामार्गाचे काम रखडलेले असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महामार्गावरून समोरून वाहन गेल्यास पाठीमागील वाहन चालकांना व पादचारी नागरिकांना दिसत नाही. महामार्गावरील धुरळ्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा असलेले व्यापारीवर्ग तसेच रिक्षा व टेम्पो व्यावसायिक धुळीने त्रस्त होत आहे. दुकाने, टपऱ्या शेजारील हॉटेलवर प्रचंड धुळीचे लोट बसत आहेत. लांजा शहरातील अर्धवट ठप्प पडलेल्या महामार्गाच्या कामामुळे प्रवासी, वाहनचालक, विद्यार्थी यामुळे त्रस्त झाले आहेत.






