| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माथेरान नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरील धामोते ते कोदीवले या भागातील रस्ता धुळीचा बनला आहे. नेरळ ते कळंब पोही फाटा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग आरसीसी काँक्रीटचा बनवला जाणार आहे. मात्र, मंजूर झालेले रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू होण्याचा ठिकाणा नाही आणि त्यामुळे धुळीचा रस्ता स्थानिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. दरम्यान, या रस्त्यावर काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात होईपर्यंत बांधकाम विभाग हा रस्ता असाच धुळीचा ठेवणार का? असा सवाल वाहनचालक करीत आहेत.
माथेरान-नेरळ-कळंब हा राज्यमार्ग रस्त्यावरील 10 किलोमीटर लांबीचा रस्ता आरसीसी काँक्रीटचा बनविला जाणार आहे. दरम्यान, या मार्गावर नेरळ पासून कळंब पोही फाटा या भागातील रस्ता काँक्रीटचा बनविला जाणार असून त्या 112 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता दिलीप हिंगे यांनी दिली आहे. नेरळ-कळंब राज्यमार्गावर असलेल्या रस्त्यावर धामोते परिसरातील एक किलामीटर लांबीचा रस्ता काँक्रीटचा बनविला आहे. नेरळ- कळंब या 12 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर कोंदीवले ते दहिवली पूल या भागातील खड्ड्यातून वाट काढणे दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी आणि अवजड वाहनांसाठी देखील त्रासदायक ठरत आहे.त्यामुळे या खड्ड्यांमुळे वाहने चालविणे कठीण होऊन बसले आहे.त्याचवेळी पोशीर कंपनी टेकडीपासून सिनियर सिटीझन फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर डांबर निघून गेले असल्याने धोकादायक बनला आहे. अन्य रस्ता चांगल्या स्थितीत असावी अशी स्थानिक वाहनचालक यांची मागणी सतत राहिली आहे. आता हा रस्ता शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रीड तत्वावर बांधणार आहे. शासनाने हा रस्ता हायब्रीड तत्वावर बांधण्यासाठी मान्यता दिली असून 112 कोटींचे अंदाजपत्रक बनविण्यात आले असून या रस्त्यावर एक किलोमीटर लांबीचा रस्ता वगळता अन्य रस्ता देखील काँक्रीटचा बनविला जाणार आहे.
दरम्यान, रस्त्याचे बांधकाम सुरू होण्यास मोठा अवधी जाणार असून पावसाळ्यापासून या रस्त्यावरील नेरळ रेल्वे फाटक ते निर्माणनगरी फाटा तसेच धामोते धनेश्वरी मंदिर पासून कोदीवले आणि अवसरे ते वरई या भागातील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्या धामोते ते कोदीवले हा रस्ता मातीचा बनला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम मिळविणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याचे काँक्रिटीकरण कधीही करावे पण रस्त्यावरील मातीचा रस्ता वाहनांना वाहतूक करण्यायोग्य तयार करावा अशी मागणी करण्यात येत आहे. किमान रस्त्यावर डांबरीकरणाचा एक थर टाकून रस्ता वाहतूक योग्य करावा, अशी मागणी नेरळ-कळंब, नेरळ-पोशीर, नेरळ-वंजारपाडा या भागात तीन चाकी रिक्षा चालवणाऱ्या जय मल्हार रिक्षा संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
निवडणुकीला बसणार फटका
जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समिती निवडणूक आगामी काळात होत आहे.नेरळ कळंब रस्त्याचा वापर दोन जिल्हा परिषद गटांमधील मतदार करतात.गेली वर्षभर हा रस्ता खराब असून रस्त्यावर उडणारी माती ही वाहनचालकांना श्वसनाच्या आजाराला आमंत्रण देणारी ठरत आहे. बांधकाम खात्याने वाहनचालकांचे हाल डांबरीकरण करून थांबवले नाहीत तर मतदार राजकीय पक्षाला धक्का देऊ शकतात.







