| पाताळगंगा | वार्ताहर |
लोहप-चौक रस्त्याचे सध्या सिमेंट काँक्रिटीकरणचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनांसाठी पर्यायी रस्ता कोपरी ते आसरोटी असा साधारणपणे एक कि.मी माळरानावरून करुन देण्यात आला आहे. परंतु, वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत असल्यामुळे श्वसनांचे त्रास होण्याची समस्या गंभीर बनत आहे. हवेत सातत्याने धूळ निर्माण होऊन समोरील वाहन दिसत नाही. यामुळे अपघातांची समस्या गंभीर बनत आहे. मात्र, रात्रीच्या वेळी अपघाताची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
तातपुरता बनविलेला रस्ता उत्तम दर्जाचा नाही, फक्त प्रवासी वर्गांची समजूत काढावी या दृष्टिकोनातून निर्माण करण्यात आला आहे. काही ठिकाणी चढण, तर काही ठिकाणी तीव्र उतरण त्यांचबरोबर खाच खड्डे असा मार्ग तयार करून दिल्यामुळे या मार्गावर नित्यनेमाने प्रवास करणारे कामगार, शेतकरी, वयोवृद्ध, तसेच आजारी व्यक्तींना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मागील दोन आठवड्यापासून या ठिकाणी या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरु आहे. यामुळे अनेकांना या पर्यायी मार्गांचा वापर करून धुळीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी वाहन जात असताना धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करू की नये? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. मात्र, दुसरा पर्याय नसल्यामुळे याच मार्गाचा अवलंब केला जातो. परिणामी उत्तम रस्ते पूर्ण झाल्याशिवाय पर्याय नसल्याने याच मार्गावरून प्रवास केला जात असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता प्रवासीवर्गाकडून वर्तवली जात आहे.
पर्यायी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
