मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
। माणगाव । प्रतिनिधी ।
संपूर्ण माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेले श्री दत्त मंदिराचा जत्रोत्सव मंगळवारी (दि.22) मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून या जत्रौत्सवात यात्रेकरूंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन जत्रौत्सव कमिटीचे अध्यक्ष अॅड. केदार गांधी व सहकार्यांनी केले आहे.
माणगाव येथील या जत्रेकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून असते. तालुक्यातील साधारण 200 ते 250 गाव व वाडी वस्त्यांतील नागरिक या जत्रेचा आनंद घेण्यासाठी येत असतात. यावेळी माणगावात मुंबई-गोवा महामार्ग, मोर्बारोड मार्ग व कचेरी रोड-निजामपूर मार्ग या रस्त्यांवर दुतर्फा विविध प्रकारची दुकाने लागून हि जत्रा सजलेली असते. या जत्रेत माणगावची ग्रामदैवत वाकडाई देवी मंदिराची पालखी येते. तसेच, कोस्ते आदिवासीवाडी, पानोसे, खांदाड, उतेखोल आदी गावांतून जत्तर काठ्या येत असतात. दरवर्षी या जत्रौत्सवाचा आनंद हजारोंच्या संख्येने नागरिक घेत असून एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल या जत्रेत होत असते. माणगावच्या या जत्रेचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेऊन हि यात्रा शांततेत व उत्साहात पार पाडावी, असे आवाहन जत्रौत्सव कमिटी माणगाव यांनी केले आहे.
यासंदर्भात जत्रौत्सव कमिटीचे अध्यक्ष अॅड. केदार गांधी यांच्या निवासस्थानी बुधवारी (दि.16) बैठक पार पडली. यावेळी गांधी यांनी सांगितले की, यावर्षी दत्तमंदिराच्या जिर्णोदराचे काम हाती घेण्यात येणार आहे. तरी यावेळी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी जत्रौत्सव कमिटीचे माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, अॅड. केदार गांधी, अमोल मोने, तेजस गांधी, काशीराम पोवार, अनंता पोवार, गोविंद पोवार, महेंद्र मेथा, नामदेव खराडे, पत्रकार सचिन देसाई, सुधाकर पालकर व संतोष मांजरे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.