। रोहा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात एकूण 4 लाख 40 हजार 884 रेशनकार्ड असून त्यामध्ये 17 लाख 54 हजार 688 रेशनकार्ड सदस्य आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड यांनी जिल्ह्यातील सर्व रेशनकार्ड व रेशनकार्डात नावे असलेल्या व्यक्तींचे व्हेरीफिकेशन करण्याचे आदेश दिले आहेत. याच आदेशाचा फायदा घेत अनेक रेशनिंग दुकानदार कुटुंबातील सर्व सदस्यांचे थंब झालेले नसल्यास ग्राहकांना धान्य देण्यास नकार देत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
जिल्ह्यातील केवळ 50 टक्के रेशनकार्ड आधार सिडिंग झाली असून, सदस्य पडताळणी केवळ 29 टक्के नागरिकांची झाली आहे. वास्तविक पाहता, काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने डिजिटल शिधापत्रिका देणे व पडताळणीसाठी सर्वांची आधारकार्ड झेरॉक्स घेऊन अर्ज भरून घेतले होते. या पडताळणीमध्ये काही लाख शिधापत्रिका राज्यात बाद झाल्याचे सांगण्यात आले होते. राज्यात एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणार्या नागरिकांना सफेद शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत, तर केशरी शिधापत्रिका असणार्या पण प्राधान्य गटात नसणार्या रेशनकार्डधारकांना कोणत्याही प्रकारचे धान्य व सुविधा रास्त भाव धान्य दुकानातून देण्यात येत नाहीत. यामुळे संबंधित रेशनकार्डधारक रेशनिंग दुकानापर्यंत पोहचत नाहीत. रेशनिंग दुकाने केवळ धान्य वाटप करण्यासाठी उघडे असते. महिन्यातील अन्य दिवशी रास्त भाव धान्य दुकान बंद असल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांचे थंब व्हेरीफिकेशन करताना नागरिकांना अडचणी येणार आहेत. तरी लोकप्रतिनिधींनी इ-केवायसी सक्तीबाबत लक्ष देणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.