लाडक्या बहिणींना ‌‘ई-केवायसी’ बंधनकारक

निषक पूर्ण करण्यासाठी महिलांची धडपड

| उरण | विठ्ठल ममताबादे |

गोरगरीब वंचित घटकातील महिलांना तसेच ज्यांचे आर्थिक उत्पन्न खूपच कमी आहे अशा महिलांना शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. मात्र, ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी बंधनकारक आहे. यासाठी लाडक्या बहिनींची धडपड सुरू असताना, आता ई-केवायसी करताना पती अथवा वडिलांचे आधार कार्ड जोडण्याची नवीन अट काहींना जाचक ठरत आहे. परंतु, ज्या महिलांचे वडील वारले आहेत व पती हयात नाही किंवा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांची अधिकच अडचण झाली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला कायमचे मुकावे लागणार की काय, अशी भीती सतावत आहे.

ज्या महिलांचे वडील-पती हयात नाहीत, त्यांची अडचण होत आहे. त्यांच्यासाठी नवीन निर्देश देण्याची मागणी करण्यात येत आहे. नाहीतर त्यांचा हप्ता कायमचा बंद होण्याची भीती त्यांना वाटत आहे. वडील किंवा पतीच्या आधारवरून आता उत्पन्न तपासण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आता कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. शासनाने यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी लाभार्थी महिलांनी अर्थातच लाडक्या बहिणींनी प्रशासनाकडे केली आहे.

आवश्यक कागदपत्रं
शासकीय योजनेच्या या लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती, पती अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक नोंदवावे लागणार आहे. तरच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी योजना सुरू करण्यात आली आहे.
सेवा केंद्रावर महिलांची गर्दी
या योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळावर अथवा ई-महासेवा केंद्रावर महिलांना ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी शासनाकडून सक्तीची करण्यात आलेली केवायसी करण्यासाठी महिलांची सेवा केंद्रामध्ये गर्दी होत आहे. परंतु, अनेक वेळा सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत असल्याने शहर व गाव खेड्यात येणारे महिलांना परत जावे लागत आहे. अनेक वेळा आधारकार्डमध्ये काही समस्या असल्याचे केवायसी होत नाही. यामुळे अनेक महिलांची योजना बंद होण्याची भीती वाटू लागली आहे. लाडकी बहीण योजनेत अनेकदा वेगवेगळे बदल करण्यात येत असल्यामुळे तसेच प्रत्येक वेळी निकषा मध्ये बदल करण्यात येत असल्याने लाभार्थी महिला अडचणीत आल्या आहेत. सारख्या बदलत राहणाऱ्या निकषामुळे महिला वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Exit mobile version