। पुणे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेतील अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या अर्ज प्रणालीमधील खात्याची आधार आणि इतर पद्धतीने ‘केवायसी’ करणे अनिवार्य असणार आहे. प्रत्येक अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने ‘केवायसी’ पडताळणी केली नाही, तर त्याला अर्ज भरता येणार नाही. स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरेल. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांच्या (एमपीएससी) माहितीसाठी प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.
ही पडताळणी झाल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. आयोगाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. आयोगाच्या नवीन नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्यापूर्वी आपली ओळख पडताळणी विहित पद्धतीने पूर्ण करणे अनिवार्य राहील.
या प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांनी वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) करून आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर ओळखपत्रांच्या आधारे ङ्गकेवायसीफ करावी. 15 जुलैनंतर कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे..ही प्रक्रिया केवळ एकदाच पूर्ण करावी लागेल. त्यासाठी एकच प्रोफाइल सक्रिय राहील. अन्य खाती निष्क्रिय समजली जातील. याशिवाय अर्ज भरतानाचा आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक एकच असावा लागेल. अन्यथा ओटीपी न मिळाल्यास ई-केवायसी शक्य होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
ई-केवायसीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. उमेदवारांनी ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण करून स्पर्धा परीक्षेच्या तयारीत कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.
आयोगाच्या या निर्णयाचे विद्यार्थी आणि शिक्षकांकडून स्वागत होत आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी सांगितले, हे पाऊल पारदर्शकतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला होता. त्यानंतर आयोगाकडून नियमावलीत सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे ई-केवायसीची सक्ती हे पारदर्शकतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
अन्य एका विद्यार्थ्याने सांगितले की, गेल्या काही काळात चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज करणारे, बनावट कागदपत्रे दाखविणारे काही उमेदवार निवड प्रक्रियेत पुढे गेले. त्यामुळे खऱ्या पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.
ई-केवायसीमुळे अशा बनावट उमेदवारांना आळा बसेल आणि योग्य उमेदवारांना संधी मिळेल. ई-केवायसीमुळे एमपीएससी परीक्षेच्या प्रक्रियेत आवश्यक ती पारदर्शकता येणार आहे. यामुळे बनावट ओळख असणाऱ्या अर्जदारांना अडथळा निर्माण होईल आणि खऱ्या मेहनती तसेच पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. आयोगाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. विश्वासार्हतेच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे.
– पी. डी. चव्हाण,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक







