तळा कृषी विभागाकडून विशेष मोहीम
| तळा | वार्ताहर |
जे लाभार्थी येत्या सोमवार (दि.1) पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाही, त्यांची नावे पीएम किसान योजनेतून वगळण्यात येणार आहेत. अशी माहिती तळा तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी दिली. यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक दिले असून, त्यात तालुक्यातील 147 लाभार्थ्यांची ई-केवायसी, तर 845 लाभार्थ्यांची आधार सिडिंग प्रलंबित असल्याचे म्हटले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. सध्या शेतकरी 15 वा हप्ता कधी जमा होणार याची वाट पाहात आहेत. परंतु, पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमिअभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्या आहेत. दि.1 ऑक्टोबर ही केवायसी व आधार अपडेट करण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलवरून लाभार्थी सूचीतून अशा लाभार्थींची नावे वगळली जातील व योजनेच्या लाभापासून वंचित राहण्यास संबंधित खातेदार शेतकरी स्वतः जबाबदार राहतील, असे आनंद कांबळे यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना ई- केवायसी व बँक खाते आधार सलग्न करण्यासाठी काही अडचण असल्यास आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आनंद कांबळे यांनी केले आहे.