| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान मध्ये विद्यार्थ्याची पायपीट कमी करण्यासाठी सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालविली जाते. मात्र या ई-रिक्षा मधून विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना सवलती मध्ये ई-रिक्षा मधून प्रवास करता येत नव्हता. येथील कॉन्व्हेन्ट शाळेचे शिक्षक योगेश जाधव यांनी आपल्याला देखील सवलतीच्या दरात ई-रिक्षा मधून प्रवास करता यावा अशी मागणी केली आणि अखेर माथेरान पालिकेने शिक्षकांसाठी ही सेवा पूर्ववत सुरू केली.
माथेरान मध्ये शाळा या शहरातील नागरी वस्तीच्या अगदी विरुद्ध दिशेला आहेत. त्यामुळे तेथे विद्यार्थ्यांना जाताना पुरती दमछाक होते. हे लक्षात घेवून विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी आणि जेष्ठ नागरिकांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू करण्याचा निर्णय सर्वोच्य न्यायालयाने दिला आहे. त्यासाठी माथेरान मधील श्रमिक हातरिक्षा संघटना यांनी 12 वर्षे न्यायालयीन आणि कायदेशीर लढा दिला होता. पर्यावरण पूरक ई-रिक्षाचा पायलट प्रकल्प सुरू झाल्यावर माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेने सर्व शाळांमधील विद्यार्थी यांच्यासाठी एकवेळचा प्रवास करण्यासाठी पाच रुपये आणि शहरातील अन्य नागरिक यांच्यासाठी 35 रुपये असा दर निश्चित केला होता. त्यानुसार प्राचार्य गव्हाणकर हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल आणि नगरपरिषद शाळांचे विद्यार्थी यांच्यासाठी आणि त्या शाळांमधील शिक्षक यांच्यासाठी एकेरी प्रवासासाठी पाच रुपये दर निश्चित करून सवलत दिली होती. जानेवारी 2024 पासून पर्यावरण पूरक ई रिक्षाचा दुसरा पायलट प्रकल्प राबविला जात आहे. त्यावेळी माथेरान मधील स्थानिकांच्या विविध विषयावरील आयोजित बैठकीत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे गलेलठ्ठ पगार घेणार्या शिक्षकांना ई रिक्षा मधून सवलत कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला होता.
त्यानंतर पाच महिने सुरू असलेली सवलत बंद करून माथेरान मधील शाळांचे शिक्षक यांना सर्वसामान्य प्रवासी यांच्याप्रमाणे 35 रुपये दराने प्रवास करावा लागेल असे निर्णय पालिकेने घेतला होता. त्या निर्णयाविरुद्ध माथेरान मधील संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि माथेरान नागरी पतसंस्थेचे सचिव योगेश जाधव यांनी माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे लेखी पत्र देत नाराजी व्यक्त केली होती. सेंट झेवियर्स हायस्कूल मधील शिक्षकांना पाच आकडी देखील पगार नाही आणि ते शिक्षक महिन्याचे ई रिक्षाचे 2100 रुपये भाडे कसे भरू शकतात?
असा प्रश्न उपस्थित केला होता. माथेरान पालिका विद्यार्थी आणि शिक्षक यांना मासिक पासेस देत असल्याने पालिकेने पाच रुपये एकेरी प्रवासाची अट घातल्याने शिक्षक वर्गात नाराजी पसरली. मात्र पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी शिक्षकांचे म्हणणे योग्य असल्याचे मान्य करीत 25 मार्च पासून बंद करण्यात आलेली सवलत पुन्हा सुरू केली आहे. आता पूर्वी सारखे पुन्हा एका माथेरान मधील सर्व शाळांचे शिक्षक हे पाच रुपये सवलतीच्या दरात आपले घर ते शाळा असा एकेरी प्रवास सुरू करू शकतात.
प्रसार माध्यमांनी आमच्या शिक्षकांच्या तक्रारीची दखल घेतली आणि त्यानंतर माथेरान पालिकेने देखील त्या विषयकडे सकारात्मक पाहत पुन्हा एकदा माथेरान मधील शाळांचे शिक्षक यांना सवलतीच्या दरात ई-रिक्षा मधून प्रवास करता येऊ लागला आहे.
योगेश जाधव,
शिक्षक