माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकाची मनमानी!

स्थानिक तरुणीला उद्धट उत्तरे; पर्यटकांसाठी रिक्षा, मात्र स्थानिक मुलीला नकार

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये ई-रिक्षांची संख्या कमी असल्याची चर्चा सुरू असतानाच, स्थानिक तरुणीला रात्रीच्या वेळी रिक्षा सेवा नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. रिक्षाचालकाने तरुणीला उद्धट उत्तरे दिल्याचा आरोप असून, अखेर तक्रारीची भाषा केल्यानंतर रात्री साडेदहा वाजता तिला रिगल नाका येथे सोडण्यात आले.

शिवसेना महिला आघाडीच्या शहर संपर्क संघटक प्रीती कळंबे यांची कन्या प्रिया कळंबे या 8 ऑगस्ट रोजी रात्री पुण्याहून माथेरानच्या दस्तुरी नाका येथे पोहोचल्या. त्या मधुमेहाच्या रुग्ण असून, रात्री एकट्याने पुढे जाणे सुरक्षित नसल्याने त्यांनी ई-रिक्षाचालकाकडे रिगल नाका येथे सोडण्याची विनंती केली. मात्र, पर्यटकांना घेऊन जाण्यास प्राधान्य देत चालकाने स्थानिक तरुणीला रिक्षा देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. प्रिया यांनी घरच्यांना माहिती देत रिक्षा व चालकाचे छायाचित्र पाठविले. पोलिसांत तक्रार करण्याची भाषा केल्यानंतर चालकाने अखेर त्यांना रिगल नाका येथे सोडले. यावेळी चालकाने उद्धटपणे बोलल्याचा आरोपही करण्यात आला आहे. माथेरानच्या स्थानिक मुलीला रात्री अशा प्रकारचा त्रास होऊ नये. रिक्षा संघटनेने या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रीती कळंबे यांनी केली आहे. दरम्यान, रात्री ई-रिक्षा सेवा कोणत्या नियमांनुसार सुरू असते आणि स्थानिकांना सेवा नाकारून पर्यटकांकडून अधिक भाडे घेतले जात असल्यास त्यावर परिवहन विभाग काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version