ई-रिक्षा ठरतेय स्थानिकांसाठी जीवनवाहिनी

रोजगारात वाढ; पर्यटकांचा माथेरानकडे ओघ

| माथेरान | वार्ताहर |

पावसाळ्यात कधी नव्हे एवढी प्रचंड प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत असून याचे मुख्य कारण म्हणजे इथे स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणारी पर्यावरणपूरक ई-रिक्षा आहे. ज्या आबालवृद्ध मंडळींना माथेरानला येण्याची अनेक वर्षांपासून प्रबळ इच्छा होती, त्यांना ह्या सेवेमुळे अगदी सहजपणे दस्तुरी नाक्यावरून माथेरान स्टेशनपर्यंत केवळ माफक दरात 35 रुपयांत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ त्याचप्रमाणे दिव्यांग पर्यटक समाधान व्यक्त करीत आहेत.

ई-रिक्षा माथेरानच्या पर्यटनवाढीसाठी संजीवनी ठरली आहे. मागील अनेक वर्षे रडत खडत चाललेले पर्यटन आता जोर धरू पाहात आहे. दस्तुरी नाक्यावरून येताना पर्यटकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असे. आता त्याचा प्रवास सुखकारक होत आहे. परंतु, रिक्षाच्या अपुर्‍या संख्येने लोकांना ताटकळत थांबावे लागत असून, लवकरच ई-रिक्षाची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

शिवाजी शिंदे,
माजी विरोधी पक्षनेते,
माथेरान नगरपालिका

माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कारण ई-रिक्षा आहे. त्यामुळे दस्तुरीवरून अजून रिक्षांच्या संख्येत वाढ झाली तर येथील स्थानिक घोडेवाले, लॉजींगवाले, दुकानदार यांना बाराही महिने रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

प्रदीप घावरे,
माजी नगरसेवक

सध्या या वीस ई-रिक्षासुद्धा पर्यटकांच्या वाढत्या ओघामुळे कमी पडत आहेत. पर्यटक आमच्याकडे मागणी करत आहेत की, अजूनही रिक्षाची संख्या लवकरच वाढवावी जेणेकरून आम्हाला ताटकळत उभे राहावे लागणार नाही. याकामी उर्वरित 74 ई-रिक्षा लवकरच सुरू होण्यासाठी सनियंत्रण समितीने प्रयत्न करावेत.

शैलेश भोसले,
ई-रिक्षा चालक

Exit mobile version