माथेरानसाठी ई-रिक्षा क्रांतीकारक

वाहतूक समस्या सुटेल; टाटा संस्थेने नोंदवले आपले मत

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान मधील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ई-रिक्षा हा क्रांतिकारक पर्याय ठरेल असे स्पष्ट मत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेने नोंदवून आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. यामुळे पुन्हा एकदा माथेरानकरांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.

माथेरानमध्ये पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालविली गेली आणि सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने तीन महिन्यांचे पायलट प्रोजेक्ट माथेरान दरम्यान राबविण्यात आला. या पायलट प्रोजेक्ट अहवाल बनविण्याचे अधिकार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला दिले होते आणि संस्थेने सनियंत्रण समितीला अहवाल सादर केला वाहतूक व्यवस्थेसाठी हा मोठा पर्याय असेल असा निष्कर्ष आपल्या अहवालात नोंदविला आहे.

माथेरान मध्ये पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालविण्याचा पायलट प्रकल्प 5 डिसेंबर 2022 ते 4 मार्च 2023 रोजी सात रिक्षा यांनी पूर्ण केला. या ई-रिक्षा मधून प्रवास करणार्‍या प्रवासी तसेच माथेरान मधील सर्व घटक यांना या ई-रिक्षामुळे कोणता फायदा झाला, कोणते नुकसान होणार याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे अधिकार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांना दिले होते. या काळात ई-रिक्षाचा वापर करणार्‍या जनता यांचा आणि शास्त्रोक्तपणे अभ्यास करण्यासाठी सनियंत्रण समितीने टाटा सामाजिक संस्थेला दिलेली जबाबदारी पार पाडली होती.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेचे प्रा.सुहास भस्मे आणि प्रा. चैतन्य तलरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य मंडळाने ई-रिक्षा बाबत 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी सर्व्हेक्षण केले. ते सर्वेक्षण करताना ई-रिक्षा मधून प्रवास करणार्‍या व्यक्ती तसेच माथेरान मधील संस्था, संघटना यांच्या सोबत चर्चा केली. त्याचवेळी प्रातिनिधिक स्वरूपात 76 अश्‍वपालक, 36 हात रिक्षाचालक, 740हमाल, 101गृहिणी, 79पर्यटक प्रवाशी अशा प्रकारे 366 लोकांसोबत सविस्तर चर्चा केली. या संस्थेकडून माथेरान नगरपालिका सभागृहात विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्या सोबत संवाद साधला. अश्‍वपाल संघटना, हमाल संघटना यांची 30 जानेवारी तर महिला बचत गट, हात रिक्षाचालक, व्यापारी संघटना आणि हॉटेल असोसिएशनबरोबर चर्चा केली होती. त्यात महत्वाची चर्चा माथेरान मधील सर्व शाळांमधील विद्यार्थी यांच्यासोबत केली आहे. तिन्ही शाळांचे विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करताना सर्व विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने ई-रिक्षांची मागणी केली आहे.

पंधरा घटकांना फायदा
ई-रिक्षा सुरू होण्यापूर्वी एकूण 15 विविध घटकांवर होणारे परिणाम आणि ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर झालेला बदल याची माहिती आपल्या अहवालात दिली आहे. विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण, पर्यटक, अश्‍वपालक, हात रिक्षा चालक, परगावातून आलेले रिक्षा चालक, घोडे याद्वारे होणारी वाहतूक आणि ई-रिक्षा उपलब्ध नसताना वन ट्री हिल परिसरातील नागरिकांना टॅक्सी स्टँड पासून सहा ते सात किलोमीटर पायपीट करावी लागते. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल होणे त्रासदायक ठरते, तीन महिन्यांच्या ई-रिक्षाच्या पायलट प्रोजेक्ट दरम्यान या घटकांना मोठा दिलासा मिळाला असे नमूद करण्यात आले आहे. त्या भागातील नागरिकांची दमछाक थांबली आणि अवघ्या 35 रुपयात त्यांना प्रवास करता आला होता.

अश्‍वपालकांचाही पाठिंबा
अश्‍वपालकांनी ई-रिक्षा सुरू झाल्यास व्यवसायावर परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली. तर काही घोडेवाल्यांनी ई-रिक्षा ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना फायदेशीर ठरू शकते अशी मते नमूद केली आहेत. त्यामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढू शकते याचा फायदा घोडेवाल्याना देखील होऊ शकतो असा विश्‍वास व्यक्त केला. टीस या संस्थेने करंदीकर यांचा 2010 च्या पर्यावरण व्यवस्थापन आराखडा याच्या मदतीने घोड्यामुळे दस्तुरी नाका येथील पर्यावरण व सिम्पसन टँक या तलावाचा होणारा र्‍हास यावर देखील अभ्यासपूर्व मत व्यक्त केले आहे. ई-रिक्षा ह्या माथेरानचे पर्यावरण वाचविण्यास मदत करू शकतात त्यामुळे घोड्यांंच्या वाढणार्‍या संख्येवर अंकुश घालू शकतात.

ई-रिक्षाची ऊर्जा खर्च करण्याची क्षमता ही 53.76 किलो वॅट इतकी आहे. ही क्षमता इतर वाहनांपेक्षा सर्वात कमी आहे. त्यामुळे ई-रिक्षा कायमस्वरूपी सुरू करण्यापूर्वी टप्य्या टप्य्याने गरजेनुसार संख्या वाढवावी आणि ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर ज्या घटकांवर आर्थिक परिणाम होऊ शकतात अशा व्यक्तींसोबत सरकारने संवाद साधून त्यांना आर्थिक पॅकेज द्यावे, अशी महत्वपूर्ण सूचना टीसने सनियंत्रण समितीला सादर केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे. सनियंत्रण समिती ही माथेरान मध्ये सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकार आणि न्याय व्यवस्था यांच्यातील समन्वयक म्हणून काम करीत आहे.

Exit mobile version