| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये राबविण्यात येत असलेला ई-रिक्षा पायलट प्रकल्प शनिवारी (दि. 4) बंद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तीन महिन्यासाठी येथे ई-रिक्षा सुविधा सुरु करण्यात आली होती. शासनाच्या आदेशाने माथेरान पालिकेने ई-रिक्षा खरेदी केल्या आणि 5 डिसेंबर 2022 मध्ये प्रथम पाच आणि काही दिवसांनी सात पर्यावरण पूरक ई-रिक्षा यांचा पायलट प्रोजेक्ट सुरु झाला होता.
5 डिसेंबर 2022 रोजी सुरु झालेली ई-रिक्षा मधल्या तीन महिन्यांच्या काळात सकाळच्या आणि शाळा सुटण्याच्या वेळी चालू होत्या. नंतर स्थानिक नागरिक आणि माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेले पर्यटक यांना सेवा देत होत्या. सात ई-रिक्षा यांचा पायलट प्रकल्प मध्ये सकाळी साडे सहा ते रात्री दहा पर्यंत सेवा देत होत्या. त्यांचा फायदा माथेरानकर आणि पर्यटक यांना दोघांना झाला. शनिवारी (दि.4) रोजी रात्री दहा वाजता ई-रिक्षाचा मागील तीन महिने असलेला प्रवास थांबणार आहे. मागील तीन महिन्यात या ई-रिक्षेमधून तब्बल 61000 हून अधिक प्रवासी दि. 3 पर्यंत प्रवास केला आहे. तर 9000 विद्यार्थी यांची दररोज तीन ते सहा किलोमीटर चालण्याची सवय मोडली होती.
रविवारी (दि.5 ) ई-रिक्षा चालणार की बंद होणार? याबाबत शासनाकडून कोणतीही स्पष्टता नसल्याने नागरिक व पर्यटकांमध्ये संभ्रमाच वातावरण आहे. वाहतूक ही अत्यावश्यक सेवा असून त्यात खंड पडू नये. विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. माथेरानचे टॅक्सी स्टैंड गावापासून तीन किलोमीटर दूर आहे. ई-रिक्षामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व महिलांची दमछाक थांबली आहे. ई-रिक्षामुळे विद्यार्थ्यांना अवघ्या पाच रुपयांमध्ये शाळेत जाता येत असल्याने त्यांची रोज पाच किलोमीटरची पायपीट वाचली आहे, असे माथेरानकरांचे म्हणणे आहे.