| माथेरान | प्रतिनिधी |
श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे आणि त्यांना ई-रिक्षा समर्थकांनी साथ दिल्यामुळे खऱ्या अर्थाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ई-रिक्षाच्या सेवेमुळे इथे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले असून, सर्वांनाच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, 94 परवानाधारक असताना केवळ वीस ई-रिक्षा देण्यात आल्याने दि.23 फेब्रुवारीपासून ई-रिक्षाचालकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. याचा परिणाम शालेय विद्यार्थी, दिव्यांग, रुग्ण, येणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागत आहे.
एकीकडे रुग्णवाहिकेचा गैरवापर होऊ नये, असे सांगण्यात येते आणि दुसरीकडे शासकीय अधिकारी आरामात मोफत सुविधेचा उपभोग घेत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबतीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अधिकारी वर्गावर अंकुश ठेवण्यासाठी गावात कुणी सक्षम लोकप्रतिनिधी नाहीत का? असाही प्रश्न स्थानिकांना सतावत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी सुध्दा ई-रिक्षा बंद असल्याने याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. ही सुविधा बंद असल्यामुळे बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. ई-रिक्षाच्या संख्येत वाढ करावी, असे सर्वोच्च आदेश दिलेले असताना देखील अकार्यक्षम सनियंत्रण समिती जाणूनबुजून या श्रमिकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या समितीला बरखास्त करून टाका. अन्यथा ई-रिक्षाच्या वाढीसाठी आम्हाला आमरण उपोषण करावे लागेल, असे महिला वर्गाकडून सांगण्यात आले आहे.







