माथेरानमध्ये ई-रिक्षापुढे आव्हानांचे डोंगर

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये ई-रिक्षा धावणार हे स्पष्ट झाले असले तरी त्या रिक्षापुढे अनेक आव्हानांचे डोंगर आ वासून उभे राहणार आहेत. त्यातून ही रिक्षा कशी धावणार याचीच चिंता सर्वांना लागली आहे.

माथेरान मधील श्रमिक हातरिक्षा चालकांना गुलामीच्या जोखडातून मुक्ती मिळण्यासाठी पर्यावरणपूरक ई-रिक्षाचा पर्याय समोर आला. सर्वोच्च न्यायालयाने तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर माथेरान मध्ये ई-रिक्षा सुरू करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरान क्षेत्रावर देखरेख समितीने नगरपालिकेने सात ई-रिक्षा तीन महिन्यासाठी चालवाव्यात असे निर्देश दिल्याने नगरपालिकेकडून याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र ई-रिक्षाच्या मार्गात अनेक आव्हाने असणार आहेत. ही आव्हाने पेलून ई-रिक्षा सक्षमपणे धावेल असा विश्‍वास येथील स्थानिकांना वाटत आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी ई-रिक्षा बाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांसोबत अलिबाग येथे सनियंत्रण समितीमार्फत बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान ई-रिक्षाची एक दिवसीय चाचणी घेण्यात आली होती. याचा आढावा घेण्यात आला. याबाबत सनियंत्रण समितीच्या काही सदस्यांनी ई-रिक्षाच्या चालण्याबाबत आक्षेप घेतला यावर परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी ई-रिक्षा योग्य रीतीने माथेरान मध्ये धावू शकते आम्ही स्वतः चाचणीवेळी याचे परीक्षण केले आहे असे स्पष्ट केल्याने सनियंत्रण समितीने सात रिक्षांना तीन महिने सेवा देण्यासाठी परवानगी दिली आहे. याबाबत नगरपालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. ही सेवा देण्यासाठी अनेक आव्हाने पालिकेला पार करावी लागणार आहेत.

रस्ता तयार करण्याचे आव्हान
माथेरान मध्ये सात सप्टेंबर रोजी सायंकाळच्या वेळेस फक्त दीड तास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामध्ये सखाराम तुकाराम पॉईंट ते अमन लॉज स्थानक येथ पर्यंत काही ठिकाणी रस्ता खचला आहे, चर पडले आहेत, काही ठिकाणचे पेव्हर ब्लॉक वाहून गेले आहेत. जवळजवळ 500 मीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा महात्मा गांधी रोड एकमेव माथेरानला जोडणारा आहे. त्यामुळे दस्तुरी ते माथेरान शहर या दोन किलोमीटर अंतरावर याच रस्त्यावरून ई-रिक्षा धावणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत हा रस्ता पूर्ववत होत नाही तोपर्यंत ई-रिक्षा धावण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

चार्जिंग पॉईंट सुरु होणार
ई-रिक्षा सुरू करण्याअगोदर प्राथमिक व्यवस्थेला महत्व देत माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने ई-रिक्षा चार्जिंग पॉईंट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. माथेरानमधील वाहनतळात एमटीडीसीच्या मागील बाजूस जागा करण्याचे प्रयत्न आहेत. त्या ठिकाणी शेड उभारून ई-रिक्षा उभ्या राहतील तसेच विद्युत पॉईंट काढून चार्जिंग व्यवस्था होणार आहे पण येणार्‍या पर्यटकांच्या गाड्या, समोर असलेलं मिनीबस थांबा, वाहतूक करणारे घोडे, पर्यटन हंगामात लोकांची वर्दळ, त्या रस्त्यावर उतरणार्‍या गॅस सिलिंडर टाक्या या सर्वांचे मोठे आव्हान असणार आहे.

दस्तुरी येथे ई-रिक्षा पार्किंग
ई-रिक्षा पार्किंग करण्यासाठी माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी जागा निश्‍चित करण्यात येणार आहे. पण येथे असणारे 200 ते 250 घोडे, पर्यटकांची वर्दळ याचे आव्हान पेलून पार्किंग करावी लागणार आहे.

ई-रिक्षा येण्यासाठी माथेरान नगरपालिका सर्व आव्हाने पेलण्यास तयार आहे. खराब झालेला रस्ता हा त्वरित करण्यासाठी संबंधित एमएमआरडीएच्या ठेकेदाराला सूचना करणार आहोत, चार्जिंग पॉइंटसाठी जागा निश्‍चित झाली आहे, रिक्षा पार्किंगसाठी जागेची चाचपणी सुरू आहे. घोड्याना किव्हा पर्यटकाना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

सुरेखा भणगे-शिंदे, मुख्याधिकारी

माथेरान मध्ये ई-रिक्षा होणे गरजेचे आहे. जर कोणी आजारी पडला तर माथेरान बाहेरील हॉस्पिटल मध्ये नेण्यास खूप त्रास होतो, जेष्ठ नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. ई-रिक्षामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबेल. परिवर्तन व्हायलाच हवंय त्याशिवाय माथेरान मध्ये पर्यटन क्रांती होणार नाही. ई-रिक्षा सुरू होण्यासाठी नगरपालिकेने पावले उचलणे अपेक्षित आहे.

मनोहर रांजाणे,स्थानिक सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version